मला पाचशे कोटी दिलेत का?
---
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल
---
बीड, ता.२० : ‘‘मला पाचशे कोटी रुपये दिले आहेत, असे तुम्ही दिल्लीत भाजप नेत्यांना सांगितले का’’, असा थेट सवाल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आणि याचे तातडीने उत्तर देण्याची मागणीही केली.
शिरूर कासार तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायण गडावर मंगळवारी (ता. २०) झालेल्या दसरा मेळाव्यात जरांगे यांनी शिंदे यांना पुन्हा लक्ष्य केले. या मेळाव्यात त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर, विशेषतः शिंदे यांच्यावर टीका, आरोप केले. ते म्हणाले, ‘‘दोन-अडीच वर्षांपूर्वी एक भयंकर षड्यंत्र रचले गेले होते. त्यासंदर्भातील माहिती आता समोर येत असून, मला त्याचे उत्तर हवे आहे. दिल्ली किंवा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तुम्ही (शिंदे) माझ्याबद्दल असे सांगितले का, की जरांगेंना पाचशे कोटी रुपये द्यायचेत, तुम्ही भाजपकडून पाचशे कोटी घेऊन मला दिलेत, अशी कुजबूज सध्या भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. मला जर हे पैसे मिळाले असते, तर मी ते दुष्काळग्रस्तांना वाटले असते. या प्रकरणाचा छडा लावणार आहे. भाजपला मला संपवायचे आहे की एकनाथ शिंदेंना संपवायचे आहे, याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही’’.
---
कट रचल्याचा दावा
आपल्या जिवावर बेतणारा मोठा कट रचला जात असल्याचा दावा करताना जरांगे म्हणाले, ‘‘माझ्याकडे पुराव्यांसह माहिती आहे की मला कसे मारायचे, याविषयी गुप्त चर्चा झाली होती. या ३० ते ४० मिनिटांच्या संभाषणात एका माजी मुख्यमंत्र्याचे नाव आहे. तो नेता ‘बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहे’ असे म्हणायचा. ही इतकी भयंकर माहिती आहे, की ती ऐकल्यावर तो नेता पक्ष सोडून पळून जाईल’’. आमच्याविरोधात बोलताना मर्यादेत राहा, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
------
विरोधात कॅबिनेट बैठका
सरकार आपल्याविरोधात सतत कॅबिनेटच्या बैठका घेत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. ‘‘अलिकडे झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मराठा आणि कुणबी एकच असून आरक्षणाबाबत चर्चा होणे अपेक्षित होते, पण ती झालीच नाही. जे देता येत नाही ते थेट नाही म्हणून सांगा, असे समाजातील काही नेत्यांनी सांगून आरक्षणाला बगल देण्याचा प्रयत्न चालवला आहे’’ असा आरोप त्यांनी केला.
-----
जरांगे यांच्या घोषणा
- घराघरांत मराठा सेवक तयार करणार. यात सहभागी होणाऱ्यांसाठी २२ ऑक्टोबरला एक मोबाइल क्रमांक दिला जाईल. त्यावर नाव, गाव, पत्ता पाठवून नोंदणी करावी.
- कुणबी प्रमाणपत्र नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडणार ः कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिले जात नाही, अर्ज स्वीकारले जात नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारींसाठी दुसरा मोबाइल क्रमांक देणार.
- हॅल्पलाइन नंबर ः मराठा समाजाच्या समस्या, अडीअडचणी मांडण्यासाठी तिसरा मोबाइल क्रमांक जाहीर केला जाईल.