मुक्काम टाळणार, मुंबई गाठणार
---
मनोज जरांगे ः पाटोद्यातून आज रवाना होणार
---
बीड, ता. १६ : ‘‘प्रकृती खालावली असली तरी आता श्रीगोंदा, खोपोली आणि हडपसरचा मुक्काम टाळून पाटोद्यातून (जि. बीड) गुरुवारी (ता. १७) दुपारी बाराला निघून थेट मुंबईला जाणार आहे. या दरम्यान, समाजबांधवांनी सोबत येऊ नये, रस्त्यातही स्वागताला थांबू नये. मला कुणी अडविले तर कळविल्यानंतरच मुंबईच्या दिशेने या’ असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बुधवारी (ता. १६) केले.
मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून मंगळवारी (ता. १५) दुपारी जरांगे हे काही निवडक सहकाऱ्यांसह मुंबईकडे निघाले. पहिला मुक्काम पाटोद्यात होता. तेथे त्यांची प्रकृती खालावली. वैद्यकीय पथकाने तपासणी केली. रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत, पुढील प्रवास करू नये, असा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला. दरम्यान, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी मुंबईत जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
जरांगे म्हणाले, ‘‘माझी तब्येत अचानक खूप बिघडली होती. रात्रीपासून अस्वस्थ वाटत असल्याने पाटोदा येथील मुक्कामास्थळी मराठा समाजाच्या आग्रहास्तव पाणी, सलाइन, उपचार घेतले. आज पूर्ण दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला. आता थोडे बरे वाटत असून गुरुवारी दुपारी बाराला थेट मुंबईसाठी निघणार आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आता श्रीगोंदा, हडपसर, खोपोली येथे मुक्काम करणार नाही. १८ सप्टेंबरपर्यंत मुंबईच्या हद्दीत पोचण्याचा प्रयत्न असेल. ठरल्याप्रमाणे १९ सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहे.’’
सोबत आलेल्यांनी परतावे
--
‘‘माझ्यासोबत पाटोद्यापर्यंत आलेल्यांनी सध्या आपापल्या गावांत परतावे. सध्या मी केवळ दहा ते बारा सहकाऱ्यांसोबत पाच ते दहा वाहनांसह मुंबईत जाणार आहे. आता मला कोण अडवते ते पाहू द्या. मला माझी खेळी आणि डाव टाकू द्या. मला कुणी अडवले तर योग्य वेळी तारीख सांगेन, तेव्हा सर्वांनी मुंबईकडे या. मी बोलावल्याशिवाय कुणीही घाई करू नये. प्रवासाच्या वाटेतही कुणी स्वागतासाठी येऊन गर्दी करू नये,’’ असेही जरांगेंनी सांगितले.
बोलावले तर चर्चेला जाणार
--
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुंबईत येण्याचे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यावर जरांगे म्हणाले, ‘‘ मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रश्न सोडवावेत. त्यांनी चर्चेला बोलावले तरच जाईन, अन्यथा नाही. हैदराबाद गॅझेटसंदर्भातील निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा, अध्यादेशात (जीआर) आवश्यक दुरुस्त्या करून किती दिवसांत काम पूर्ण करणार, ते स्पष्ट सांगावे. त्यांनी तसे आश्वासन दिले तर उपोषण मागे घेण्याचा विचार करीन. मला हलक्यात घेण्याची चूक सरकारने करू नये. मी मुंबईत घुसणारच आहे,’’ असे जरांगे म्हणाले.
सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन
--
जरांगे यांचा ताफा गुरुवारी दुपारी बाराला पाटोद्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. १८ सप्टेंबरला मुंबईत जाण्याचे त्यांचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने पाटोद्यासह मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.