मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ
मांजरा नदीवर ‘रास्ता रोको’
-----
कळंब, ता. ७ (बातमीदार) : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळंब-केज मार्गावरील मांजरा नदीवर मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. सात) दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नायब तहसीलदार गोकुळ भराडिया यांनी आंदोलकाच्या भावना शासनापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारी (ता. सात) दहावा दिवस होता. उपोषणाची शासन दखल घेत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी कळंब-केज राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यात शहरासह ग्रामीण भागातील महिला, तरुण, नागरिक आणि सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, रास्ता रोको करताना रुग्णाला नेणारी रुग्णवाहिका आली होती. आंदोलकांनी तातडीने रस्ता रिकामा करत वाट करून दिली.