फोटोसह
PRB26B65950
मानवत ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
------
मानवत शहराचा पाणीपुरवठा विस्कळित
------
फायबर केबलच्या कामामुळे जलवाहिनी फुटली; दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार
----
मानवत, ता. ९ (बातमीदार) : शहरात एका कंपनीच्या अंतर्गत फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असताना निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे पाच ते सहा पाइप फुटल्याने सहा दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. नवरात्रोत्सव तोंडावर आल्याने तयारी सुरू असताना तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
रविवार (ता. चार) पासून रात्रीच्या सुमारास केबल टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून मुख्य जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले. सुरवातीला एकाच ठिकाणी गळती दिसून आली होती; परंतु दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर इतर भागांतही पाइप फुटल्याचे समोर आले. यामुळे दुरुस्तीचे काम अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
-----
पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच मानवत पालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता, तंत्रज्ञ व कामगारांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चार दिवसांपासून दिवस-रात्र गळती शोधणे, नवीन पाइप बसविणे, पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असला, तरी लवकरात लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.
-----
((कोट))
एअरटेल कंपनीने रीतसर परवानगी घेऊनच काम सुरू केले होते. मात्र, कामादरम्यान जलवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- कोमल सावरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, मानवत
----
((कोट))
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करत आहे. येत्या दोन दिवसांत सर्व भागांत पाणी पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. अंकुश लाड, उपनगराध्यक्ष, न.प., मानवत