मराठा समाजाच्या वधू-वर
परिचय मेळाव्याला प्रतिसाद
----
लवकरच घेणार सामूहिक विवाह सोहळा
----
हर्सूल, ता. २१ : महाराष्ट्र मराठा समाज सोयरीक प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने मधुरा लॉन्स येथे ३९ वा राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा रविवारी (ता. २०) झाला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात राज्यभरातून १,०९० वधू-वरांनी सहभाग नोंदवला. या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर लवकरच सामूहिक विवाह सोहळा घेण्याचे ठरले असल्याची माहिती आयोजक भाऊसाहेब काळे आणि संस्थापक पोपटराव सपकाळ यांनी दिली.
या मेळाव्यात ७८० वर आणि ३१० वधूंनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. कल्याण काळे होते. संतोष कावले, संदीप चव्हाण, रेखा काळे, रंजना काळे आणि किरण पाटील डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. सहभागी वधू-वरांना टोकन देऊन व्यासपीठावर परिचयासाठी पाचारण करण्यात आले. प्रत्येकाने स्वतःचा परिचय देत भावी जीवनसाथीविषयीच्या अपेक्षा व्यक्त केल्या. योग्य सोयरीक जुळावी या उद्देशाने झालेल्या या मेळाव्याला राज्यातील विविध जिल्ह्यांतून पालक आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंकुश मनगटे आणि प्रतिभा जगताप यांनी सूत्रसंचालन केले. राजेश भुसारे यांनी आभार मानले.