Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे मराठवाड्यातील ९४ जणांनी घेतले प्रशिक्षण, अडचणींवर मात

मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आणि मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी १९६७ पूर्वीच्या नोंदींचा धांडोळा घेणे सुरू झाले.
Maratha Reservation certificate Helps 94 in Marathwada Overcome Challenges
Maratha Reservation certificate Helps 94 in Marathwada Overcome ChallengesSakal

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आणि मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी १९६७ पूर्वीच्या नोंदींचा धांडोळा घेणे सुरू झाले.

त्यात मराठवाड्यातील खानेसुमारी व इसमवारीच्या सुमारे ७० टक्के नोंदी या मोडी लिपीतील असल्याने त्या अक्षरांची फोड करण्यासाठी भाषेच्या जाणकारांची गरज भासू लागली, तर दुसरीकडे मोडीचे कमी जाणकार असल्याने या नोंदी वाचण्यासाठी अडचणी येऊ लागल्या.

यावर प्रशासनाने उपाययोजना करीत आपल्या कर्मचाऱ्यांनाच मोडी लिपीचे प्रशिक्षण दिले. त्यातून ९४ जणांना प्रशिक्षण देऊन मोडी लिपीची अक्षरओळख करून दिली देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलने झाल्यावर जात प्रमाणपत्र देण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारे निजामकालीन पुरावे,

वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, निजामकाळातील करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज आदी अभिलेखांचा धांडोळा घेण्यात आला. त्यावेळी भूमी अभिलेखातील जुन्या अभिलेखांपैकी खानेसुमारी नमुना-३४ व इसमवारी नमुना-३३ मधील नोंदी बहुतांश अभिलेखे मोडी लिपीत असल्याचे दिसून आले आणि सध्या या भाषेचे जाणकार कमी असल्याने जुन्या अभिलेखांचे अर्थ लावण्यात अनेक अडचणी येऊ लागल्या.

यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील महसूल, भूमी अभिलेख व सहायक निबंधक कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेऊन तसे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.

त्यानुसार गेल्या महिन्यात आणि या महिन्यात दोन टप्प्यांमध्ये काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोडी लिपीचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्या लिपीतील कागदपत्रे वाचता येतील, एवढे मोडी लिपीचे जाणकार करण्यात आल्याचे मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे मोडी लिपीतज्ज्ञ डॉ. कामाजी डक यांनी हे प्रशिक्षण दिले. त्यांनी मोडी लिपीचा इतिहास, बाराखडी, मराठवाड्यातील मोडीतील कागदपत्रे कोणती कोणती आहेत, त्यांचे वाचन कसे करावे, हे शिकवून त्यांच्याकडून मोडी लिपीतील कागदपत्रांचे वाचन करवून घेतले.

शिवकाळात बहरली लिपी

डॉ. डक यांनी सांगितले, १२ व्या ते २० व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात राज्यकारभारात व व्यवहारात मोडी लिपीचा वापर होता. देवगिरीचे राजे, यादवकाळातील प्रधान हेमाद्री यांना मोडीचे जनक मानले जाते.

प्राचीन काही मंदिर शैलींना हेमाडपंती हे नावदेखील हेमाद्रीच्या नावावरूनच पडले आहे. पुढे शिवकाळात ही लिपी बहरली. या लिपीचा सर्रास राजदरबारात वापर होत असे. १९६० पर्यंत या लिपीचा महाराष्ट्राच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षणात वापर केला जात होता. मात्र, काळाच्या ओघात मोडी लिपी हळूहळू मागे पडली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com