ऋतुचे रंग सणाचे तरंग कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ऋतुचे रंग सणाचे तरंग कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on: 
‘ऋतूचे रंग, सणाचे तरंग’ची रंगत ----- दिवाळी पहाटच्या स्वरमंचावर बालगायिका वीरा हाक्के, अमोल मालेगावकर, विजय जोशी यांचा सुरेल आवाज ---- नांदेड, ता. ९ : पत्रकार विजय जोशी निर्मित ‘ऋतूचे रंग, सणाचे तरंग’ हा गुढीपाडव्यापासून होळीपर्यंतच्या विविध सण-उत्सवांची स्वरयात्रा उलगडणारा अनोखा कार्यक्रम सोमवारी नांदेडच्या बंदाघाट येथे दिवाळी पहाटच्या निमित्ताने रंगतदार ठरला. नायगावची बालगायिका वीरा हाक्के, संगीत दिग्दर्शक अमोल मालेगावकर आणि पत्रकार विजय जोशी यांच्या विविध रचनांनी दिवाळी पहाटच्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम रसिक-प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. गेल्या तेरा वर्षांतील गर्दीचे सर्व विक्रम नांदेडकरांनी मोडीत काढल्याची प्रतिक्रिया यावेळी रसिकांनी व्यक्त केल्या. गुरुद्वारा बोर्ड, नागरी सांस्कृतिक समिती आणि अशोकनगर गृहनिर्माण संस्था यांच्या विद्यमाने दोनदिवसीय दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता झाली. उद्‍घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर तसेच संयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे, प्रख्यात गझलकार बापू दासरी यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात आणखी रंगत भरली. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनामागे ॲड. गजानन पिंपरखेडे यांची संकल्पना होती. गजानन कुलकर्णी, कृष्णा बोंम्पीलवार, रविराज भद्रे, राज लांबटिळे आणि आदित्य डावरे यांनी संगीतसाथ केली. यावेळी आमदार हेमंत पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह नागरिकांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मदतपेटीत सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले. यशस्वीतेसाठी शंतनू डोईफोडे, ॲड. गजानन पिंपरखेडे, बापू दासरी, लक्ष्मण संगेवार, वसंत मैया, विजय होकर्णे, चारुदत्त चौधरी, पुरुषोत्तम जोशी, अशोकनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे आनंद जवादवार, गिरीश देशमुख आदींनी पुढाकार घेतला. ---- एकापेक्षा एक सरस गाण्यांची मैफल नऊ वर्षीय वीरा हाक्के हिने आपल्या गायनाने रसिक-प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. ‘आधी गणाला रणी आणला’, ‘या विठूचा गजर हरिनामाचा’, ‘बाजे रे मुरलिया’, ‘अंबाबाई लाड लाड’, ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘खेळताना रंग बाई होळीचा’, ‘हे गाव लय न्यारे’, ‘बुगडी माझी सांडली गं’ आणि ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’ अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी या नायगावच्या बालकलाकाराने धमाल उडवून दिली. तर संगीत दिग्दर्शक अमोल मालेगावकर यांनी ‘मायबाप स्वामी माझे’, ‘मुरलीवर माझा’, ‘भलगरी दादा’ आणि ‘बजाओ ढोल स्वागत में’ या वैशिष्ट्यपूर्ण रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. -- ‘वाट दिसू दे गा देवा’ पत्रकार विजय जोशी यांनी ‘उठ पंढरीच्या राया’, ‘जिवा शिवाची बैलजोड’ आणि ‘वाट दिसू दे गा देवा’ ही गाणी सादर करून कार्यक्रमात जोशपूर्ण वातावरण निर्माण केले. माधुरी पाटील वाकोडकर हिने ‘शंभो शंकरा’, रुणुझुणु त्या पाखरा’ आणि ‘आज लक्ष्मीचं रूप’ ही गीते सादर करून रंगत आणली. उन्मनी डुघरेकर (बोरीकर) हिने ‘अशी चिकमोत्याची माळ’ आणि ‘नवरात्रीला नवरूपे’ ही गाणी सादर करून कार्यक्रमात वेगळाच रंग भरला. गायक विजय बंडेवार यांनी ‘फिरत्या चाकावरती’ हे गीत सादर केले, तर अभिनव पाटील यांनी ‘हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा’ हे भक्तिगीत सादर केले. गणेश हाक्के यांनी महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.