Marathwada News : मराठवाड्यात गड राखण्याचे ठाकरे गटासमोर आव्हान; शून्यातून करावी लागणार सुरवात

परप्रांतीयांचा वाढता जोर, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुंबईत स्थापना केली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal

छत्रपती संभाजीनगर - परप्रांतीयांचा वाढता जोर, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुंबईत स्थापना केली. ठाकरे शैलीतील मनाला भिडणाऱ्या त्यांच्या भाषणांमुळे मुंबईत शिवसेना घराघरांत पोचली.

पण, मुंबईबाहेर शिवसेनेची त्यावेळी पाळेमुळे रोवली गेली ती मराठवाड्यात. हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणाऱ्या बाळासाहेबांना मराठवाड्यातील जनतेने मतांचे मतपेटीतून भरभरून दान दिले. पण, बाळासाहेबांच्या माघारी मराठवाड्यात शिवसेनेची शकले उडाली असून, गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या १२ पैकी आठ आमदार व एक खासदार शिंदे गटात गेले.

पाच जिल्ह्यांत एकही लोकप्रतिनिधी नसल्याने ठाकरे गटाला याठिकाणी सुरुवात शून्यातून करावी लागणार असून, बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

मुंबईत १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला. त्यानंतर शिवसेनेला मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगरात यायला १९ वर्ष लागली. ८ जून १९८५ रोजी मराठवाड्यातील शिवसेनेचे पहिली शाखा छत्रपती संभाजीनगरात सुरू झाली. त्यानंतर शिवसेनेने जालना, परभणी, धाराशिव बीड, नांदेड असा प्रवास करत करत आपली पाळेमुळे रुजवली.

छत्रपती संभाजीनगरात १९८८ च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर शिवसेनेने मागे वळूनच पाहिले नाही, महापौर, उपमहापौर, आमदार, मंत्री, खासदार अशी अनेक पदे छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने पाहिली.

१९९५, २०१४ च्या युती सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर भागाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या शहराने शिवसेनेच्या वाट्याला गेल्या पस्तीस वर्षांत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अपवाद सोडला तर मोठा पराभव कधी येऊ दिला नाही.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील या शहरावरची आपली माया शेवटपर्यंत कायम ठेवली. पुढे उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगरचे महत्त्व कमी होऊ दिले नाही. अनेक फाटाफुटीनंतरही शिवसेनेचा मराठवाड्यातील बोलबाला कायम होता.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मराठवाड्याने चांगलेच तारले. १२ आमदार व तीन खासदार शिवसेनेचे निवडणूक आले. दरम्यान, उद्धव ठाकरे व भाजपचे मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग अडीच वर्षे चालला.

रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असलेली मातोश्री पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या रूपाने थेट मुख्यमंत्रिपदावर जाऊन बसली, तेही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने. हा निर्णय अनेक कट्टर शिवसैनिकांना रुचला नाही. मातोश्रीचा फक्त आदेश पाळणाऱ्या शिवसैनिकांच्या मनात असलेली अडीच वर्षांची खदखद एकनाथ शिंदे यांच्या बंडाने बाहेर पडली. शिवसेनेची सत्ता तर गेलीच; पण त्यासोबत पक्ष, चिन्ह सर्वच उद्धव ठाकरे यांना गमवावे लागले.

शिंदे यांच्या बंडाला मोठी रसद मराठवाड्यातूनच मिळाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच आमदारांसह नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील अशा आठ आमदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या जालना, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली या पाच जिल्ह्यात निवडून आलेला एकही लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पक्षाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

स्वकीयांसमोर संघर्ष

गेल्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती. त्यासोबत युती असल्यामुळे भाजपचीही साथ होती. मात्र, आगामी निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना व भाजपसोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मराठवाड्यात जास्तीत-जास्त जागा मिळविण्यासाठी महायुतीतही करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी उमेदवार आयात करावे लागतील, अशी ठाकरे गटाची स्थिती सध्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com