दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’ पूर्वी राज्याची मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’ पूर्वी राज्याची मदत
Published on
(फोटो ओळ ः __________) ------ दुष्काळग्रस्त मराठवाड्यात ‘एनडीआरएफ’पूर्वी मदत ------- देवेंद्र फडणवीस ः चारा व पाणीटंचाईवर सरकार करणार मात ------- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट पसरले. खरिपाची पिके करपली. नियमानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी ५ ऑक्टोबरनंतरचे पंचनामे आवश्यक असले, तरी त्यापूर्वीच राज्य शासनाने सर्वेक्षणाची तयारी सुरू केली आहे. एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन) निधीपूर्वीच राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १७) दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, चारा व पाणीटंचाईवर मात केली जाईल, असेही ते म्हणाले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. ध्वजवंदनानंतर ते म्हणाले, ‘‘मराठवाड्यात यंदाही दुष्काळाचे संकट कायम आहे. पावसातील खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे; परंतु सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्राच्या मदतीपूर्वी राज्य सरकारकडून मदत पोचवली जाईल.’’ वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत चाऱ्याची लागवड करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने योग्य नियोजन केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या तीन याद्यांद्वारे मराठवाड्यातील १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. उर्वरित याद्याही लवकरच जाहीर करण्यात येतील. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबरोबरच त्यांची ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’’ असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार संदीपान भुमरे, डॉ. कल्याण काळे, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, सतीश चव्हाण, प्रा. रमेश बोरनारे, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विलास भुमरे, अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील, माजी आमदार संजय केणेकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापालिका आयुक्त अमोल येडगे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम. यांची उपस्थिती होती. --- वैद्यकीय क्षेत्रासाठी काय? शहरात ७१० कोटी रुपये खर्चून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत उभारण्यात येणार आहे. धाराशिव येथे ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय व नवीन वैद्यकीय महाविद्यालय, तर परळी येथे ५६५ कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. --- ७० टीएमसी पाण्यासाठी डीपीआर अंतिम टप्प्यात मराठवाड्याच्या पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, हा शासनाचा संकल्प आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी भीमा खोऱ्यामार्फत मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पाला वेग देण्यात आला असून, जागतिक बँकेने ‘फ्लड मिटिगेशन’ प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या माध्यमातून सुमारे ३० टीएमसी अतिरिक्त पाणी धाराशिव, बीड आणि लातूरपर्यंत पोचवण्याचे नियोजन आहे. उल्हास खोऱ्यातील पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पातून सुमारे ७० टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागेल. या प्रकल्पामुळे मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. --- शेंद्रा-बिडकिन औद्योगिक क्लस्टर देशातील प्रमुख केंद्र समृद्धी महामार्ग, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि डीएमआयसीमुळे शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्लस्टर देशातील प्रमुख केंद्र बनले आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यू आणि एथरसारख्या कंपन्यांमुळे छत्रपती संभाजीनगर हे देशातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी आणखी आठ हजार एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. जालना ड्राय पोर्टचे काम सुरू झाले असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांची आयात आणि तयार वाहनांची निर्यात या मार्गे करण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेंद्रा-बिडकीन व बिडकीन-ढोरेगाव रस्त्यांचे सहापदरीकरण, तसेच शहरातील सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. -- संभाजीनगर शहराला रोज पाणी छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच शहरातील प्रत्येक घराला दररोज पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे; तो दिवस आता दूर नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com