सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत
--
जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार
--
छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची चिन्हे, विहिरींच्या पाणीपातळीत घट आणि जनावरांच्या चाऱ्याची संभाव्य टंचाई अशा तिहेरी संकटाच्या उंबरठ्यावर जिल्हा उभा आहे. जिल्ह्यात पावसाची २६ ते २७ टक्के तूट असून, उपलब्ध चारा जेमतेम फेब्रुवारी अखेरपर्यंत पुरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतापासूनच चारा, पाणी आणि पशुधन व्यवस्थापनाचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, सीईओ मिन्नू पी.एम. यांनी संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी विभागांनी समन्वयाने दुष्काळपूर्व उपाययोजना राबवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
कमी पावसामुळे मका आणि कापसाचे उत्पन्न घटण्याची शक्यता असतानाच, उपलब्ध चारा फेब्रुवारी अखेरपर्यंत पुरण्याचा अंदाज आहे. यापुढेही परतीच्या पावसाची स्थिती सुधारली नाही, तर चारा टंचाईचे मोठे संकट निर्माण होऊ शकते, असे सांगत सीईओ मिन्नू पी.एम. यांनी दुष्काळपूर्व तयारी, चारा उत्पादन, पाणी व्यवस्थापन आणि बाधित शेतकऱ्यांना मदत यासाठी विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी जलव्यवस्थापन बैठकीत सांगितले, की “जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३८ टक्के, पैठणमध्ये ३६ टक्के, खुलताबादमध्ये ३५ टक्के आणि गंगापूरमध्ये २९ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. वैजापूरमध्ये १८, फुलंब्रीमध्ये १९, कन्नडमध्ये २२, सिल्लोडमध्ये १०, तर सोयगावमध्ये दोन टक्के तूट आहे. काही तालुक्यांत चार ते सात आठवड्यांचा पावसाचा खंड पडला.” त्यावर अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
--
गायरान आणि शेतजमिनीवर मुरघास
कृषी विभागाच्या अंदाजानुसार, उपलब्ध चारा सुमारे १५२ दिवस पुरू शकतो. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेती महामंडळाच्या १३ गावांतील सुमारे तीन हजार ५०० एकर जमिनीवर चारा उत्पादनाची शक्यता तपासली जात आहे. उपलब्ध होणाऱ्या गायरान आणि शेतजमिनीवर मुरघास आणि हिरवा चारा तयार करून मागणीनुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी जमीन वापर, भाडे आणि उत्पादकांना भरपाई देण्याबाबत स्पष्ट धोरण निश्चित केले जाणार आहे.
--
ऊसतोडीतील वाढ्याचा चाऱ्यासाठी वापर
ऊसतोडीनंतर मिळणारे वाढे जनावरांसाठी जतन करावे लागणार आहेत. यासाठी साखर कारखान्यांनी यंत्राऐवजी कामगारांकडून ऊसतोड करावी, यासंदर्भात जिल्हा परिषद स्तरावरून पत्रव्यवहार करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. चारा बाहेरच्या जिल्ह्यांत आणि राज्यांत जाण्याला प्रतिबंध करण्याची सूचना सदस्यांनी केली. शिवाय गायरान आणि शासकीय जमिनीवर चारा पिकविण्याचे पर्यायही सुचवले. कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि सिंचन विभागांनी ग्रामपंचायत स्तरावर सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश सीईओ मिन्नू पी.एम. यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
--
जल जीवनच्या २०७ कामांना ३१ ऑक्टोबरची डेडलाइन
जिल्ह्यात आतापर्यंत जल जीवन मिशनची २०७ कामे ७५ टक्के पूर्ण झाली असून, उर्वरित विद्युत जोडणी, दुरुस्ती आणि अन्य कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही स्थितीत पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश सीईओ मिन्नू पी.एम. यांनी अधिकाऱ्यांसह कंत्राटदार एजन्सी व्यापकोसला दिले. पाणी बचत, जलस्रोतांचे बळकटीकरण आणि संभाव्य टंचाईग्रस्त भागांत आरोग्य व पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठीही संबंधित विभागांनी समन्वय साधण्यावर भर देण्याचे त्यांनी बजावले.