संधी, उद्योग, विकासाचा नवा मराठवाडा

संधी, उद्योग, विकासाचा नवा मराठवाडा
Published on: 
संधी, उद्योग, विकासाचा नवा मराठवाडा ... (((इंट्रो १)) मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक भान जपणारे उद्योजक म्हणून डॉ. उल्हास गवळी यांची ओळख आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतील इन्डेस हाऊजर कंपनीचा प्रकल्प आणि शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील स्कोडा कंपनीचा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी पुढाकार घेणाऱ्यांपैकी एक आहेत. स्कोडा कंपनीचे अधिकृत सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. परदेशी आणि भारतीय उद्योगांना छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यात त्यांचेही योगदान राहिले. ते चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्षही आहेत. औद्योगिक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सिपेट, गरवारे क्रीडा संकुल अशा महत्त्वाच्या संस्था आणि सुविधांच्या उभारणीसाठी समकालीन उद्योजक, नेते यांच्यासह त्यांनीही पाठपापुरावा केला. सार्वजनिक जीवनातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, सरकारी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांनी स्थानिक विकास आणि सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. औद्योगिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. गवळी यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. --------- ((इंट्रो २))) एकेकाळी मागासलेपणाची ओळख असलेला मराठवाडा आज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीचे आकर्षण ठरत असून, छत्रपती संभाजीनगर औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहे. शेंद्रा, ऑरिक, बीडकीनसारख्या औद्योगिक वसाहतींमुळे रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढत असताना स्थानिक कुशल मनुष्यबळही उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होत आहे. मात्र, या विकासाला गती देण्यासाठी विमानतळाचा विस्तार, आधुनिक रेल्वे संपर्क, पाणी, वीज, रस्ते, निवास आणि नियोजनबद्ध शहरीकरण आवश्यक आहे. वाढत्या स्थायी लोकसंख्येबरोबरच रोज ये-जा करणाऱ्या ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’चाही विचार करून दीर्घकालीन नियोजन करावे लागेल. ... ‘एकेकाळी मागास म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर वेगाने वाढत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा विस्तार, आधुनिक रेल्वे संपर्क आणि शहर परिसरात नियोजनबद्ध वसाहती आवश्यक आहेत’, असे मत ज्येष्ठ उद्योजक तथा नारायणा इन्फ्रा. कंपनीचे व्यवस्थापकीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास गवळी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘मराठवाड्याच्या राजधानीच्या ठिकाणी शेंद्रा-ऑरिक डीएमआयसी, बीडकीन आणि नवीन प्रस्तावित आरापूर यासारख्या औद्योगिक वसाहतींचा विकास होत आहे. आता पायाभूत सुविधांचे दीर्घकालीन नियोजन, शहरीकरणाचे व्यवस्थापन आणि स्थानिक मनुष्यबळाचे सक्षमीकरण ही काळाची गरज बनली आहे. पूर्वी मराठवाड्याची ओळख न्यूनगंड आणि मागण्यांच्या राजकारणाशी जोडली जात होती. सरकारकडे सुविधा मागण्याऐवजी आज मराठवाड्यात उपलब्ध असलेल्या संधी, कौशल्ये आणि क्षमतांची मांडणी होत आहे. त्यामुळे ‘आमच्याकडे काहीच नाही’ या मानसिकतेची जागा ‘आमच्याकडे दर्जेदार शिक्षण, कुशल मनुष्यबळ, दळणवळणाच्या सुविधा आणि औद्योगिक क्षमता आहे’ या आत्मविश्वासाने घेतली आहे. ही मानसिकता बदलणे हा प्रदेशाच्या औद्योगिक प्रगतीतील सर्वांत मोठा टप्पा आहे. औद्योगिक विकासाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्थानिक मनुष्यबळाच्या गुणवत्तेत झालेली वाढ. एकेकाळी नागपूरसारख्या शहरांवर अवलंबून असलेला उद्योग क्षेत्रातील कुशल कामगारवर्ग आता स्थानिक पातळीवर तयार होत आहे. त्यामुळे उद्योग विस्ताराला अधिक बळ मिळत असून, अधिकृत एमआयडीसी क्षेत्राबाहेरही नवीन औद्योगिक समूह आकार घेत आहेत’’, असेही त्यांनी सांगितले. राज्य पातळीवरील सकारात्मक धोरणे आणि स्थानिक प्रशासनातील अडथळे यांतील विसंगती अद्याप कायम असून, मोठ्या गुंतवणुकीकडे अल्पकालीन राजकीय फायद्याऐवजी दीर्घकालीन प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. डॉ. गवळी यांनी औद्योगिक विकास आणि नागरी विकास यांची सांगड घालण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांच्या मते, एखाद्या शहरात मोठे उद्योग येणे म्हणजे केवळ कारखान्यांची संख्या वाढणे किंवा रोजगारनिर्मिती होणे नव्हे, तर त्या उद्योगांशी संबंधित संपूर्ण अर्थव्यवस्था विकसित होणे होय. नव्याने येणाऱ्या कंपन्यांना पूरक उद्योग, सुट्या भागांचे उत्पादक, वाहतूक, गोदामे, सेवा क्षेत्र आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले, तर स्थानिक उद्योजकांनाही व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील. यासाठी स्थानिक लघु आणि मध्यम उद्योगांना मोठ्या कंपन्यांच्या पुरवठा साखळीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. तसेच औद्योगिक विस्ताराचा फायदा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रादेशिक पातळीवर नियोजन करणे आवश्यक आहे. शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना केवळ आजच्या गरजा पाहून चालणार नाही. पुढील वीस ते तीस वर्षांत निर्माण होणारी लोकसंख्या, रोजगाराच्या संधी, औद्योगिक विस्तार आणि नागरिकांची बदलती जीवनशैली यांचा अंदाज घेऊन पायाभूत सुविधांची उभारणी करावी लागेल. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबरोबरच कामगार आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबांसाठी दर्जेदार शिक्षण, आरोग्य, मनोरंजन आणि सार्वजनिक सुविधा उपलब्ध असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा उद्योग येतील; मात्र त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ शहरात टिकवून ठेवणे कठीण होईल. त्यामुळे औद्योगिक धोरण आणि शहर विकासाचे नियोजन स्वतंत्रपणे न करता दोन्हींचा एकत्रित विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ------- जितक्या संधी, तितकी आव्हानेही छत्रपती संभाजीनगरच्या चारही दिशांना जशा औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत, तशी नवी आव्हानेही समोर येत आहेत. वाढत्या उद्योगांमुळे पाणी, रस्ते, वीज, वाहतूक आणि निवास व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच बदलणारी जीवनशैली स्वीकारण्याची सामाजिक तयारीही तितकीच आवश्यक असल्याचे ते म्हणाले. --- ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’चाही व्हावा विचार सध्याचे वाहतूक नियोजन केवळ स्थायी लोकसंख्येपुरते मर्यादित ठेवू नये. रोज ये-जा करणाऱ्या सुमारे २० टक्के ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’चाही विचार करणे गरजेचे आहे; अन्यथा मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये निर्माण झालेल्या गर्दीच्या आणि पायाभूत सुविधांवरील ताणाच्या समस्या भविष्यात येथेही निर्माण होऊ शकतात, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.