डॉ. उन्मेष टाकळकर : सकाळ संवाद दिवाळी अंक

डॉ. उन्मेष टाकळकर : सकाळ संवाद दिवाळी अंक
Published on: 
मराठवाडा बनतोय मेडिकल टुरिझमचे जागतिक केंद्र ः डॉ. उन्मेष टाकळकर डॉ. उन्मेष टाकळकर हे युनायटेड केअर सिग्मा रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुवर्णपदकासह शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतील नामांकित संस्थांमध्ये वैद्यकीय प्रशिक्षण घेतले. त्यांच्यासमोर परदेशात करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध होती. मात्र, मराठवाड्यातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, या ध्येयाने त्यांनी परदेशातील संधी नाकारून छत्रपती संभाजीनगरमध्येच कार्य करण्याचा निर्णय घेतला. ------ ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भागीदारीतून किमान पाच सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणे अत्यंत आवश्यक आहे. आज मराठवाड्यात वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली असून छत्रपती संभाजीनगर हे शहर मेडिकल टुरिझमचे जागतिक केंद्र बनत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर आता अत्याधुनिक उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध आहेत. शासनाने महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनांच्या नियमांमध्ये काळानुसार आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. आजार होऊ नये यासाठी प्रत्येकाने वाहनांप्रमाणेच स्वतःच्या शरीराची वर्षातून किमान एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेणे ही काळाची मोठी गरज आहे. ---- ग्रामीण भागातील रुग्णांना आजही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या शहरांची वाट धरावी लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान पाच सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारून सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून (पीपीपी) आरोग्य सुविधांचा विस्तार करणे आवश्यक आहे, असे मत युनायटेड केअर सिग्मा रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील आरोग्य व्यवस्था, कर्करोग उपचार, वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील आव्हानांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, गृहनिर्माण संस्था आणि इतर शासकीय विभागांकडे मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा आहेत. त्यावर सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या तत्त्वावर सुपर स्पेशालिटी रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर्स आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार उपचार मिळतील. मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध होईल. मराठवाड्यात गेल्या तीन दशकांत वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाल्याचे सांगताना डॉ. टाकळकर म्हणाले, पूर्वी कर्करोग उपचारांसाठी शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी हेच पर्याय उपलब्ध होते. आज टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अत्याधुनिक रेडिएशन तंत्रज्ञामुळे रुग्णांचे आयुर्मान आणि जीवनमान दोन्ही सुधारले. हे सर्व तंत्रज्ञान आणि उपचार छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असल्याने रुग्णांना आता उपचारांसाठी महानगरांकडे धाव घेण्याची गरज नाही. कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. पण, लवकर निदान आणि जनजागृतीमुळे उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले. ग्रामीण भागात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे, तर शहरी भागात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. योजनांतील नियमांची फेरतपासणी व्हावी ‘शासनाच्या आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारख्या योजना लाखो रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. मात्र बदलते तंत्रज्ञान, नवीन औषधे आणि आधुनिक उपचारपद्धती लक्षात घेता या योजनांतील पॅकेजेस आणि नियमांची दर एक-दोन वर्षांनी फेरतपासणी करून आवश्यक बदल करणे गरजेचे आहे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुवर्णपदकांसह शिक्षण पूर्ण केले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतील नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले. परदेशात करिअरची संधी असतानाही मराठवाड्यातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, या ध्येयाने छत्रपती संभाजीनगरमध्येच कार्य करण्याचा निर्णय घेतला. एका छोट्या नर्सिंग होमपासून सुरू झालेला प्रवास आज अत्याधुनिक सुविधा असलेल्या सिग्मा रुग्णालयापर्यंत पोचला’, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर आता ‘मेडिकल टुरिझम’चे केंद्र बनत आहे. यमन, नायजेरिया, सौदी अरेबिया, ब्रिटन, न्यूझीलंड आणि अमेरिकेसह विविध देशांतील रुग्ण उपचारासाठी येथे येत असल्याचे डॉ. टाकळकर यांनी सांगितले. कमी खर्चात दर्जेदार उपचार, आंतरराष्ट्रीय मानांकन आणि प्रशिक्षित डॉक्टरांमुळे परदेशी रुग्णांचा विश्वास वाढल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) निदान प्रक्रियेत उपयुक्त असली, तरी डॉक्टरांचा अनुभव आणि योग्य निर्णयक्षमता यांना पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचा विचार केल्यास तंत्रज्ञान आणि माणुसकी यांचा सुरेख संगम असणे खूप गरजेचे आहे. आज आपल्याकडे जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, ही आपल्या सर्वांसाठी खरोखरच मोठी आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा उपचारांसाठी होणारा मोठा खर्च आणि शारीरिक त्रास निश्चितपणे कमी होईल. शासनाने ग्रामीण भागातही अत्याधुनिक सुविधा पुरविण्यास योग्य प्राधान्य दिल्यास सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक निरोगी आणि सुखी बनू शकेल. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची स्वतःहून काळजी घेतली पाहिजे. योग्य आणि संतुलित आहार, दररोजचा नियमित व्यायाम तसेच व्यसनांपासून दूर राहणे या साध्या गोष्टींमुळे आपण अनेक गंभीर आजारांना सहजपणे दूर ठेवू शकतो. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज कॅन्सरसारख्या आजारांवरही यशस्वी मात करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आजारी पडल्यावर अजिबात न घाबरता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे कधीही फायदेशीर ठरते. सर्वांनी मिळून जर आरोग्याविषयी मोठी जागरूकता वाढवली, तर आपला संपूर्ण समाज खऱ्या अर्थाने अत्यंत सुदृढ, सशक्त आणि निरोगी तसेच अतिशय उत्तम आणि आनंदी बनेल यात शंका नाही. ---- शरीराचीही सर्व्हिसिंग करा एचआयव्ही, कावीळ ब आणि ब्लड कॅन्सरसारख्या आजारांची आजही मोठी आव्हाने. आजारानंतर उपचारापेक्षा आजार होऊ नयेत, यासाठी काळजी घेणे अधिक महत्त्वाचे. वाहनांप्रमाणे प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यावी. वेळेत निदान झाल्यास अनेक गंभीर आजारांवर यशस्वी उपचार शक्य होतात. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.