Marathwada Muktisangram 2023 : मराठवाड्याचे नाव देशाच्या पटलावर नेणारे तीन सेनांनी

गोपिनाथराव मुंडे हे वसंतराव भागवतांचे फाईन्ड. भागवतांच्या ''माधव'' पॅटर्नचे मुंडे बिनीचे शिलेदार बनले
विलासराव देशमुख  गोपीनाथराव मुंडे
विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडेsakal

‘‘मराठवाड्यातील नेत्यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा आपल्या कर्तृत्वाचा ठसा हा उमटवलेला आहे. देशात पंतप्रधानपदानंतर नंबर दोनचे महत्त्वाचे पद मानले जाणारे केंद्रीय गृहमंत्री पद मराठवाड्यातील दोन नेत्यांच्या वाट्याला आले. शंकरराव चव्हाण यांनी राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंहराव या दोन पंतप्रधानांच्या बरोबर केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम करताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा राष्ट्रीय राजकारणावर उमटवला.

तर शिवराज पाटील चाकूरकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील त्यांच्या निष्ठेची आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवीत सोनिया गांधी यांनी त्यांना मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री पद दिले. त्या निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर निवडून आले असते तर कदाचित त्यांना देशाचे सर्वोच्च पदही मिळाले असते अशी त्यांच्या अनुयायांमध्ये भावना आहे.’’

जयंत महाजन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान देखील मराठवाड्याच्या शंकराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या चौघांनी मिळविलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद मिळविण्याचा सन्मान देखील मराठवाड्यातील दोघांच्या वाट्याला आलेला आहे .त्यातले पहिले सुंदरराव सोळुंके आणि दुसरे गोपीनाथराव मुंडे.

विशेष म्हणजे दोघेही बीड जिल्ह्याचेच भूमिपुत्र होते. भाजपचे स्ट्रॅटेजिस्ट व वाजपेयी सरकारचे संसदेतील सर्वोत्कृष्ट फ्लोअर मॅनेजर प्रमोद महाजन हे देखील मराठवाड्याचे. वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. वाजपेयी सरकार हे मित्र पक्षांच्या जोरावर उभे होते त्यामुळे ममता बॅनर्जी ,जय ललिता, मायावती यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी देखील त्यांचा सुसंवाद होता.

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने प्रमोद महाजन यांचे नाव घेतले जाई. देशातील प्रमुख उद्योगपतींची असलेले घनिष्ठ संबंध हे सुद्धा त्यांचे पक्षातील बळ वाढवणारे ठरले .

अडवाणी यांच्या रथयात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे प्रकाश झोतात आलेले प्रमोद महाजन यांचा प्रभाव भाजपमध्ये एकेकाळी एवढा वाढलेला होता की पंतप्रधान पदाचे भाजपमधील संभाव्य उमेदवार म्हणून सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्याबरोबर प्रमोद महाजन यांचे नाव घेतले जात होते.

पण त्यांच्या अकाली निधनाने सर्वकाही अचानक संपले. महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे नेते म्हणून मराठवाड्यातून तीन नावे प्रामुख्याने सामोर येतात ती म्हणजे शंकराव चव्हाण, विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावर कमी काळ मिळाला पण त्यांचा राजकीय प्रवास अजून चालू आहे.

मराठवाड्याचे भगीरथ :शंकरराव

काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ही करिष्मा असलेली नेतेमंडळी होती. या काळामध्ये पार्टी हायकमांडशी सातत्याने एकनिष्ठ राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांची कारकीर्द आपल्या कर्तृत्वाने उत्तरोत्तर उजळत गेली. जे खाते आपल्या वाट्याला येईल त्या खात्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करायचा आणि जास्तीत जास्त लोकांचे कल्याण होऊ शकेल अशा योजना प्रभावीपणे राबवायच्या असा त्यांचा शिरस्ता होता. नेतृत्वाचे भक्कम पाठबळ असल्यामुळे राज्यातील प्रभावी नेत्यांच्या दबावाला त्यांनी कधी जुमानले नाही.

शंकरराव चव्हाण यांचे मराठवाड्याच्या विकासाला लाभलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. शंकररावांच्या प्रयत्नातून मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जायकवडी धरण, सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना विष्णुपुरी, कोयना, वारणा, मुळा आदी प्रकल्पांना त्यांनी चालना दिली. अप्पर वर्धा, पेंच, येलदरी, निम्नतेरणा दुधना, मांजरा ,नांदूर मधमेश्वर लेंडी, खडकवासला, पूर्णा असे मोठे व मध्यम प्रकल्प हाती घेऊन त्यांनी निम्म्या महाराष्ट्राची तहान भागवण्याची काम केले. अविकसित भागांच्या समतोल विकासासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना देखील शंकरराव चव्हाण यांच्या आग्रहामुळेच झाली.

शंकरराव चव्हाण यांचे प्रशासन कौशल्य वाखाणण्यासारखे होते .चांगल्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना ते निवडून आपल्या जवळ घेत आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकीत असत. चांगले अधिकाऱ्यांचे ते पाठीशी उभे राहत असत. शंकरराव चव्हाण यांचे दिल्ली दरबारी किती वजन होते याचे उदाहरण देण्यासाठी एकच प्रसंग बोलका ठरू शकेल. १९८९ मध्ये शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजीव गांधी यांनी त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगितले.

ज्या दिवशी सकाळी शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीमध्ये राजभवनात विशेष कार्यक्रम झाला आणि त्यात शंकराव चव्हाण यांचा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथविधी झाला होता.

नरसिंहराव यांच्याशी तर त्यांचा हैदराबाद मुक्तिसंग्रामापासूनचा स्नेहसंबंध राहिलेला होता. दोघांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यात मोठे काम केलेले होते. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध पन्नास वर्षापासून होते. त्यामुळे नरसिंहरावांच्या काळात शंकरराव चव्हाण यांना फ्रीहँड होता. महाराष्ट्राशी संबंधित सर्व निर्णय चव्हाणांशी सल्ला मसलत करूनच नरसिंहराव घेत असत.

विलासरावांनी केले संधीचे सोने...

विलासरावांचे व्यक्तिमत्व राजबिंडे ,देखणे आणि उत्साही होते. ते अत्यंत हजरजबाबी होते. त्यांच्याकडे कमालीचे संभाषण चातुर्य होते . त्यांच्या वक्तृत्वाचा धबधबा सुरू झाला म्हणजे सभागृहामध्ये कधी हशा उसळे, तर कधी टाळ्यांचा कडकडाट होई, तर कधी श्रोत्यांचे डोळे पाणावलेले असत ! विनोद, उपरोध आणि उपहास ही त्यांच्या वक्तृत्वाची प्रमुख शस्त्रे होती. विरोधकावर टीका करताना ते कधीही पातळी सोडून बोलत नसत आणि टोला शालजोडीतीलच लगावीत असत. शंकरराव चव्हाण विलासरावांचे राजकीय गुरू होते.

प्रारंभीच्या काळात त्यांनी विलासरावांचे नेतृत्व गुण हेरले आणि त्यांना लिफ्ट दिली. विलासराव आणि सुशीलकुमार शिंदे यांनी १९९१ मध्ये शरद पवार यांच्या विरोधात बंड केले होते. त्याची परतफेड पवारांनी १९९५ मध्ये केली. विलासराव चक्क आमदारकीची निवडणूक हरले. एवढेच नव्हे तर विधान परिषद निवडणुकीत बंड केल्यावर विलासरावांना गोपीनाथरावांनी साथ दिली पण पवारांनी पुन्हा तडाखा दिला आणि फक्त अर्ध्या मताने ते पराभूत झाले.

याकाळात ते खूप भावनाप्रधान आणि हळवे झाल्याचे तीन चार भेटीत जाणवले होते.१९९९ च्या विधानसभेला विलासराव स्वगृही परतलेले होते. माधवराव शिंदे यांनी आपले वजन विलासरावांच्या पारड्यात टाकून त्यांना मुख्यमंत्री केले.

त्यानंतर विलासराव आमूलाग्र बदलले. ते अतिशय वेगवान आणि विद्युतवेगाने राजकीय खेळ्या खेळू लागले. त्यांनी महाराष्ट्रभर जनसंपर्क वाढवला. श्रद्धा आणि सबुरी हा गुरुमंत्र त्यांनी स्वीकारला. पक्षाचे आमदार जोडले. त्याकाळात हायकमांडकडून निरीक्षक म्हणून येणाऱ्या मार्गारेट अल्वा आणि इतर निरीक्षकांनी त्यांची सातत्याने कोंडी केली पण आजचा दिवस आपला असे मानून ते काम करीत राहिले. सुशीलकुमार शिंदेंसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद पक्षश्रेष्ठींनी सोडायला लावले.

त्यांना मध्य प्रदेश, कर्नाटकाची जबाबदारी दिली. पण विलासराव २००४ च्या निवडणूकीत महाराष्ट्रात गुपचूप केंव्हा येत आणि काँग्रेस उमेदवारांना भेटून ''मदत'' करून केंव्हा जात हे कोणाला कळायचे नाही. विधानसभेचे निकाल लागताच काँग्रेसच्या दिल्ली हेडक्वार्टर मधील फॅक्सवर विलासरावांना मुख्यमंत्री करा, अशी नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची पत्रे धडकू लागली.

५२ आमदारांची पत्रे फॅक्सवर आल्यावर हायकमांडला सुशीलकुमार शिंदेंना राज्यपाल तर विलासराव यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. विलासरावांना मुख्यमंत्रीपद मिळाले तेव्हा काँग्रेसचा एकछत्री अंमल संपलेला होता आणि राष्ट्रवादीबरोबर भागीदारीमध्ये सरकार होते. त्यामुळे विलासरावांना एकाच वेळी हायकमांड आणि राष्ट्रवादी अशा दोन आघाड्यांचा सामना करावा लागे.

पण त्यांनी अतिशय शिताफीने आणि हुशारीने मराठवाड्याच्या विकासात आपले योगदान दिले. गोदावरी नदीवरील बॅरेजेसची निर्मिती, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना आणि विविध माध्यमातून मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी खेचून आणलेला प्रचंड निधी ही त्याची काही उदाहरणे आहेत.

झुंजार गोपीनाथराव

गोपिनाथराव मुंडे हे वसंतराव भागवतांचे फाईन्ड. भागवतांच्या ''माधव'' पॅटर्नचे मुंडे बिनीचे शिलेदार बनले.गोपीनाथ मुंडे हे प्रमोद महाजनांचे कॉलेजच्या दिवसापासून चे मित्र. मुंडे पाहता पाहता मासबेस असलेले नेते बनले. महाराष्ट्रातील ओबीसी समूहाचा चेहरा बनले. भाजपवरील शेटजी भटजींचा पक्ष हा शिक्का पुसून भाजपला बहुजनांचा पक्ष बनवण्याचे काम मुंडेंनी केले.

त्यांना एकनाथ खडसे, अण्णा डांगे, पांडुरंग फुंडकर यांनी मोलाची साथ दिली. विरोधी पक्षनेते म्हणून मुंडे यांनी थेट टॉपचे नेते शरद पवार यांच्यावर हल्ले चढवीत आरोपांचा धुरळा उडवून दिला होता. त्याकाळात मुंडे यांना शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख व अखेरच्या टप्प्यात सुधाकरराव नाईक यांच्याकडून मोलाचे ''मार्गदर्शन'' होत होते अशी चर्चा होती. पवारांसारख्या राष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या नेत्यांशी संघर्ष केल्याने राष्ट्रीय स्तरावर मुंडेंचे नाव गेले.

मुंडे अत्यंत आक्रमक व हुशार नेते होते. राज्यात युतीचे सरकार आले तेंव्हा मुंडे उपमुख्यमंत्री झाले. हे पद त्यांनी गाजवले. मनोहर जोशी व नारायण राणे यांच्याशी त्यांची जुगलबंदी रंगत असे. कार्यकर्त्यांत रमणारा, अडचणीतील कार्यकर्त्याला झोकून देऊन सर्व मदत करणारा हा नेता होता. भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आवर्जून भेटत.

आपुलकीने बोलत आणि त्याचे कामही झटपट मार्गी लावीत. सत्तेचा वापर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्षाचा मासबेस वाढवण्यासाठी कसा करायचा हे गोपीनाथ मुंडे यांनी अचूकपणे हेरलेले होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंडेंना मुख्यमंत्री केले तर अनेक अपक्ष आमदार व दोन लहान पक्ष सरकार ला पाठिंबा देण्यास तयार होते, अशी तेंव्हा चर्चा होती. पण शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडला नाही व युतीची सत्ता गेली.

त्यानंतर गोपीनाथ रावांना सातत्याने संघर्षरत राहावे लागले. त्यांनी राज्यभर भाजपचे नवे नेतृत्व उदयास आणले. कायकर्त्यांचे भक्कम जाळे विणले. सहकारी व खाजगी साखर कारखानदारीचे जाळे विणले. ऊसतोड कामगारांसाठी प्रदीर्घ संघर्ष करीत अनेक प्रश्न मार्गी लावले .

प्रमोद महाजन यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर महाजनांच्या भाजपमधील विरोधकांनी मुंडेंना टार्गेट केले. मुंडे पक्षांतर्गत विरोधाला एवढे वैतागले होतें की ते काँग्रेसमध्ये जाणार होते पण सुषमा स्वराज यांनी त्यांना आग्रह करून थांबवले अशा चर्चा त्याकाळी सुरू होत्या.

पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती अशी चर्चा आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी राजू शेट्टी, महादेव जानकर, पाशा पटेल यांना भाजपबरोबर घेतले . त्याचा मोठा लाभ पक्षाला झाला. १४ वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर गोपीनाथ मुंडे यांना पुन्हा सत्तेचा लाल दिवा मिळाला होता.

मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री झाल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या विकासाची खूप स्वप्ने होती. पण नियतीच्या मनात तसे नव्हते. मंत्री झाल्यावर अवघ्या आठवडाभरातच काळाने त्यांना हिरावून नेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांची कारकीर्द संपली. गोपीनाथराव आणि विलासराव या दोन नेत्यांना राजकारणात सर्वोच्च पदाच्या दिशेने वाटचाल करत असताना काळाने हिरावून नेले. हे दोन नेते आज जर हयात असते तर मराठवाड्याच्या विकासाचे चित्र वेगळे राहिले असते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्रही वेगळे दिसले असते.

( लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com