esakal | पाणीप्रश्नावरील परिषदेला आठपैकी सहा मंत्र्यांची दांडी
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीप्रश्नावरील परिषदेला आठपैकी सहा मंत्र्यांची दांडी

पाणीप्रश्नावरील परिषदेला आठपैकी सहा मंत्र्यांची दांडी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर मोठ्या प्रमाणावर राजकारण केल्या जाते; मात्र पाणीप्रश्नी आयोजित केलेल्या बैठकांकडे मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार हे पाठ फिरवताना दिसत आहेत.

भाजपतर्फे दोन फेब्रुवारीला आमदार प्रशांत बंब यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीतही अकरा आमदारांनीच हजेरी लावली होती, तर आज शिवसेनेतर्फे घेण्यात आलेल्या पाणी परिषदेतही आठ मंत्र्यांपैकी सहा मंत्र्यांनी दांडी मारली. यावरून मराठवाड्यातील पाण्याविषयी लोकप्रतिनिधी व मंत्र्यांमध्ये उदासीनता असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

हेही वाचा : काय दिले तनवाणींनी भाजपला आव्हान वाचा...

मराठवाड्यातील पीक आणि पाणीप्रश्नावर मंथन करून दिशा ठरविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी (ता.२०) पीकपाणी परिषद घेण्यात आली. या परिषदेसाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अनिल देशमुख, रोजगार हमी फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, स्वच्छ पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे बैठकीस उपस्थित राहणार होते. मात्र यापैकी केवळ सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार वगळता सर्व मंत्र्यांनी या परिषदेकडे पाठ फिरविली.

हेही वाचा : महाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...

दोन फेब्रुवारी रोजी भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यातर्फे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची पाणी परिषदेवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी मराठवाड्यातील ४४ आमदार व खासदारांना निमंत्रण पाठविण्यात आले होते; मात्र या पैकी केवळ ११ आमदारांनी या परिषदेत हजेरी लावली. दुष्काळी मराठवाड्याची ओरड करणारे आमदार मात्र पाणी परिषदेच्या कार्यक्रमास व सर्वपक्षीय बैठकीस दुर्लक्ष करतात.

हेही वाचा : कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर मराठवाड्यात धरणांची गरज : राजेश टोपे

मराठवाड्यावर अन्याय झाल्याचे बोलणारे आमदार एकजूट होण्यात मात्र अपयशी ठरले आहेत. पक्ष आणि स्वतःची प्रतिष्ठा जपण्यातच मराठवाड्यातील आमदार, खासदार, मंत्री गुंतून आहेत. दरम्यान, या परिषदेस निमंत्रण नसूनही आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. 

मराठवाड्यासाठी लढा देऊ - राज्यमंत्री सत्तार

मराठवाड्याच्या विकासासाठी, पाण्यासाठी बैठक कुणी बोलावली याऐवजी बैठक कशासाठी बोलावली याकडे सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पाहिले पाहिजे. पीकपाणी परिषदेच्या निमित्ताने सर्व जण एकत्र दिसत आहेत, चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी. आपण सर्व मिळून त्यांना भेटू व सर्व एकत्र येऊन मराठवाड्यासाठी लढाई लढू, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

हेही वाचा : Mahashivratri २०२० : या बाराव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही...

पीकपाणी परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब म्हणाले, की सरकारने आपल्याला १६८ टीएमसी पाणी देण्यासंदर्भात मंजुरी दिलेली आहे. 
 

loading image