मराठवाड्याच्या पाणीहक्कासाठी
संघर्ष समितीचा जिल्हानिहाय दौरा
परभणी, ता. ३ : मराठवाड्यातील समन्यायी पाणीवाटपाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी तसेच शेतकरी आणि नागरिकांच्या पाणीहक्कासाठी मराठवाडा समन्यायी पाणीवाटप संघर्ष समितीच्या वतीने विभागातील विविध जिल्ह्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. अभियानाची सुरवात बुधवारी (ता.चार) बीड जिल्ह्यातून होणार आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत विविध जिल्ह्यांत आंदोलन, धरणे आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार ॲड. विजयराव गव्हाणे यांनी मंगळवारी (ता. तीन) दिली.
संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे आणि ॲड. विजयराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत स्थानिक आमदार, खासदार तसेच अन्य लोकप्रतिनिधींची भेट घेऊन पाणीवाटपाच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन समितीची भूमिका मांडण्यात येणार आहे. दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, चार नोव्हेंबर बीड, पाच नोव्हेंबर हिंगोली, सहा नांदेड, सात जालना, १९ नोव्हेंबर धाराशिव, २० नोव्हेंबर लातूर आणि २१ नोव्हेंबर रोजी परभणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील पाणीवाटपाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या भागातील शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, ही समितीची प्रमुख मागणी आहे. आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दौऱ्याच्या नियोजनात माजी खासदार शिवाजीराव माने, जगदीश पाटील, प्रा. सुशीलाताई मोराळे, आमदार जनार्दन तुपे, डॉ. सदाशिव पाटील, दत्तात्रय पाटील, अशोकराव दाबके, प्रकाश आहेर, हाटेसिंग चौधरी आणि बाबासाहेब दांडगे यांच्यासह पदाधिकारी सहभागी आहेत.