पाच लाख देऊनही वाचला नाही संसार!
-
हुंड्यासाठी छळ; नांदवण्यास नकार, बीडमधील पतीसह पाच जणांवर गुन्हा
----
छत्रपती संभाजीनगर, ता. २० : मुलीचा संसार मोडू नये म्हणून आई-वडिलांनी सासरच्या मागणीनुसार तब्बल पाच लाख रुपये दिले. मात्र, पैशांची हाव काही संपली नाही. गर्भावस्थेतही पैशांसाठी छळ, गर्भपाताची धमकी, मारहाण आणि शिवीगाळ सहन केल्यानंतर विवाहितेला अखेर घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर संसार वाचविण्यासाठी नातेवाईकांसह सासरी गेलेल्या महिलेला पतीने आपण दुसरे लग्न केल्याचे सांगत नांदवण्यास नकार दिला.
बार्शी नाका (ता. जि. बीड) येथे ऑगस्ट २०२२ ते १७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत २९ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. तिचे ८ मार्च २०२२ रोजी बीड येथील मोमीन अब्दुल तौफीक याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही काळातच पती मोमीन अब्दुल तौफीक, सासू मेहेजबीन मोमीन अब्दुल रफीक, दीर मोमीन अदनान अब्दुल रफीक तसेच नणंद तहेनियत शहबाज सय्यद व मारेफत अब्दुल गफार यांनी हुंडा कमी दिल्याचे सांगून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. २० डिसेंबर २०२३ रोजी मुलगा झाल्यानंतर बाळंतपणाचा खर्चही माहेरच्यांनी केला. नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली; मात्र छळ थांबला नाही.