
Aurangabad News : फिरत्या मंगल कार्यालयात शुभमंगल सावधान!
औरंगाबाद : लग्न सोहळा म्हटले, की पैसा तर खर्च होतोच त्यासाठी वेळही खूप द्यावा लागतो. तसेच हव्या त्या तारखेला हॉल किंवा मंगल कार्यालय उपलब्ध असेलच याची शाश्वती नसते. शिवाय वधू पक्षाला आर्थिक बाजूही विचारात घ्यावी लागते.
बरेचदा सोयरीक वेळेवर जुळते. त्यांना तर अनंत अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. अशा सर्व अडचणी लक्षात घेऊन राठोडा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील दयानंद दरेकर यांनी चक्क ट्रक कंटेनरमध्ये चालते-फिरते मंगल कार्यालय तयार केले आहे.
यामुळे तुमच्या दारात ट्रक पोचला, की काही मिनिटातच मंगल कार्यालय लग्नासाठी तयार होते! यात खुर्च्या टाकून २०० जण सहज बसू शकतात. त्यांच्या या पर्यायामुळे कमी दरात, कमी वेळात, कमी जागेत लोकांना लग्न समारंभ साजरा करता येतो.
दरेकर इव्हेंट्स प्रा. लि.च्या माध्यमातून त्यांचे ‘चालते फिरते मंगल कार्यालय’ हे स्टार्टअप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इन्क्युबेशन सेंटरमध्ये नोंदणीकृत आहे. दयानंद दरेकर हे मूळचे राठोडा येथीलच आहेत.
वीस वर्षांपासून ते मंडप-डेकोरेशनचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असताना महागड्या हॉटेल किंवा मंगल कार्यालयाचा खर्च सर्वसामान्य नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील लोकांना परवडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कमी दरात, कमी वेळात, कमी जागेत लोकांना लग्नसमारंभ कसा घेता येईल, यावर ते २०१६ पासून विचार करत होते. त्यानंतर त्यांनी मोठ्या ट्रक कंटेनरलाच चालते-फिरते मंगल कार्यालय करण्याचा निर्णय घेतला.
तीन महिने परिश्रम, ५० लाख आला खर्च
चालत-फिरते मंगल कार्यालय तयार करण्यासाठी दरेकर यांनी २०२१ मध्ये कंटेनर (ट्रक) विकत घेतला. मंगल कार्यालयाचे डिझाइन तयार करून प्रक्रिया सुरू केली. तीन महिन्यांत त्यांनी ५० लाख रुपये खर्च करून ट्रकलाच सर्वसुविधांयुक्त चालते-फिरते मंगल कार्यालय बनविले आहे.
यात साऊंड सिस्टम, एसी, लाइट, जनरेटर, स्टेज, खुर्च्या अशी हायटेक व्यवस्था केली आहे. यात खुर्च्या टाकून २०० तर भारतीय बैठकीत ३०० वऱ्हाडी बसू शकतात. कंटेनर दोन्ही बाजूंनी उघडता येतो. या मंगल कार्यालयासाठी ५० हजार रुपये दर आहे.
आनंद महिंद्रा यांनी घेतली दखल
चालत्या- फिरत्या मंगल कार्यालयाचा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला होता. या मंगल कार्यालयाची संकल्पना आणि डिझाइन करणाऱ्या व्यक्तीला मला भेटायचे आहे.
दुर्गम भागात, दाट लोकसंख्या असलेल्या व कमी जागेत हे मंगल कार्यालय पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता २७ जानेवारी रोजी आनंद महिंद्रा यांनी दयानंद दरेकर यांना मुंबईत प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलाविले आहे.