मासेगावच्या ग्रामसभेत घरकुलांसह दुष्काळावर ठराव
घनसावंगी, ता. ६ : मासेगाव (ता. घनसावंगी) येथे नुकतीच ग्रामसभा उत्साहात पार पडली. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत आवास प्लस २०२४ सर्वेक्षणातील प्रतीक्षा यादी अंतिम करून त्यास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
वर्ष २०२४ मध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण न झाल्याने घरकुलापासून वंचित राहिलेल्या बेघर कुटुंबांतील गरजू लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केले आहेत. हे अर्ज मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच मासेगाव ते बेलवाडी शिवरस्त्याचे खडीकरण करणे, जालना ते जांबसमर्थ बससेवा सुरू करणे, गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकर सुरू करणे, पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी मदत जाहीर करणे, तसेच लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने योजना राबवावी, आदी ठराव ग्रामसभेत घेण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सचिव विक्रम कोळेकर, प्रशासक प्रयागाबाई पुरी, पोलिस पाटील सौरभ आनंदे, चंद्रभुज आनंदे, हनुमंत आनंदे, हनुमंत बबनराव आनंदे, साहेबराव कोळे, देविदास कोळे, छागनराव आनंदे यांच्यासह गावकरी, ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.