‘मास रेड’ मोहिमेत २५ आरोपींवर कारवाई
----
छापे मारून ४२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २४ : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी (ता. २३) विशेष ‘मास रेड’ मोहीम राबविली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच दिवशी छापे मारून पोलिसांनी २४ गुन्हे दाखल केले असून, २५ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत ४२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. शहर, ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांवर छापे मारून दारूबंदी, मटका, जुगारासह विविध अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मटका व जुगारप्रकरणी तीन गुन्हे दाखल करून चार आरोपींवर कारवाई केली. त्यांच्याकडून २१ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर दारूबंदी कायद्यांतर्गत २१ गुन्हे दाखल करून २१ आरोपींवर कारवाई केली. या कारवाईत २१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अपर पोलिस अधीक्षक आणि सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि पोलिस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती निर्भयपणे जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा डायल ११२ वर द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.