माटरगावमधून ४२ गोवंशाची सुटका
खुलताबाद, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील माटरगाव येथे अवैध गोवंश कत्तलीसाठी चालविण्यात येत असलेल्या ठिकाणावर खुलताबाद पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) पहाटे पाचला कारवाई केली. पोलिसांनी ४२ जिवंत तसेच पाच कापलेल्या अवस्थेतील गोवंश, यासह चार वाहने जप्त केली. एकूण ४२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चौघांना ताब्यात घेतले.
माटरगाव येथील एका घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तलीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील व पोलिसांच्या पथकाने पहाटे अचानक छापा टाकला. तेथून ४२ जिवंत गोवंश ताब्यात घेतले. त्यांची अंदाजे किंमत ११ लाख ७५ हजार रुपये आहे. शिवाय पाच जनावरे कापलेल्या अवस्थेत आढळली. महिंद्रा स्कॉर्पिओ, होंडा सिटी, अशोक लेलँड पिकअप आणि अल्टो कार अशा एकूण ३१ लाख रुपयांची वाहने ताब्यात घेतली. या प्रकरणात अजिम बाबू शेख (वय ३६, रा. माटरगाव), मोईन रजाक कुरेशी (वय ४५), अनिस अजिज कुरेशी आणि वाजीद अजिज कुरेशी (तिघे रा. समतानगर, छत्रपती संभाजीनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हवालदार नवनाथ कोल्हे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंद झाला.