महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा
--
उदगीर, ता. २२ (बातमीदार) : उपचारादरम्यान चुकीचे औषधोपचार करून निष्काळजीपणा केल्याने महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ ऑगस्ट २०२३ रोजी उदगीर येथील परभणीकर रुग्णालयात घडली होती. वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनीता नारायण राठोड (वय ३३, रा. भगीरथराजा नगर, उदगीर) यांच्यावर परभणीकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान येथील डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा, चुकीचे औषधोपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादी नारायण हरिसिंग राठोड (वय ४२) यांनी केला आहे. या प्रकरणातील वैद्यकीय अहवाल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील वैद्यकीय अधिकारी समितीकडून प्राप्त झाला. या अहवालाच्या आधारे तसेच फिर्यादीने २१ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात हजर राहून दिलेल्या जबाबावरून उदगीर शहर पोलिसांनी डॉ. ईसा खान परभणीकर (रा. परभणीकर दवाखाना, चौबारा रोड, उदगीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कारवार करीत आहेत.
------