विद्यार्थ्यांसाठी ‘मी ज्ञानी होणार’ उपक्रम
राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्थेच्या पुस्तकाचे कळंबमध्ये प्रकाशन
कळंब, ता. ३ (बातमीदार) : ग्रामीण व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण करून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मी ज्ञानी होणार’ उपक्रमांतर्गत २०२६-२७ या वर्षासाठीच्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (ता. ३) कळंब येथे करण्यात आले.
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तालुक्यातील खोंदला येथील सुपुत्र तथा सध्या जिल्हा परिषद, नाशिक येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन लांडगे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आणि सामान्य ज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना स्पर्धा परीक्षांची जाणीव व्हावी आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही अधिकारी व्हावीत, या ध्येयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,’ या भावनेतून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी आपण आणि सहकारी शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत असल्याचे सचिन लांडगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळावी आणि सक्षम अधिकारी घडावेत, हा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ व्यापारी दिलीप टोणगे, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, भागवत चौधरी, बाबासाहेब सारूक, विष्णू पाळवदे, लक्ष्मण मोरे, प्रशांत सलगरे, रणजित सोनुले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र बिक्कड यांनी केले.
..........................
दुष्काळग्रस्त कुटुंबांना दरमहा १५ हजारांची मदत द्या
महाराष्ट्र दुष्काळ निवारण व निर्मूलन समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
कळंब, ता. ३ (बातमीदार) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, विद्यार्थी आणि वंचित घटकांचे जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त पात्र कुटुंबांना पुढील सहा महिने दरमहा किमान १५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र दुष्काळ निवारण व निर्मूलन समितीने केली आहे. यासह पाणी, चारा, रोजगार, शिक्षण आणि आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी समितीने शासनाकडे १९ मागण्या मांडल्या आहेत.
नायब तहसीलदार गोकूळ भराडीया यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी (ता. २) निवेदन देण्यात आले. यावेळी महादेव आडसूळ महाराज, डॉ. सुभाष घोडके, कचरू टकले, नवनाथ भंडारे, माधवसिंग राजपूत, मुख्तार बेग मिर्झा आदी उपस्थित होते. दुष्काळग्रस्त गावांत नियमित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांना मोफत चारा द्यावा, मागेल त्याला रोजगार उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क परत करावे आणि मोफत प्रवास पास द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला दरमहा दहा किलो धान्य, वीजबिल व कर्जवसुलीस स्थगिती, महिला बचतगटांना कर्जमाफी आणि मोफत आरोग्यसेवा देण्याचीही मागणी आहे.
दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक गावाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करून पुरेसा निधी द्यावा. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील १५ दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेऊन समितीच्या प्रतिनिधींना भूमिका मांडण्याची संधी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.