फटाके फोडून वाढदिवस साजरा करणे भोवले
मध्यरात्रीचा रस्त्यावरील प्रकार, ५ जणांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर, ता. ७ : सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री फटाके फोडून शांततेचा भंग करणाऱ्या हुल्लडबाजांविरोधात क्रांती चौक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाढदिवसाच्या नावाखाली गर्दी जमवून मध्यरात्री फटाके फोडल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरला मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिल कॉर्नर सिग्नलच्या मागे, जिल्हा परिषद शाळेजवळ काही तरुण मोठ्या संख्येने एकत्र जमून फटाके फोडत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे क्रांती चौक पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी सुमारे १५ ते २० तरुण एकत्र जमून सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडताना आढळून आले. पोलिसांनी विचारपूस केली असता, वाढदिवस साजरा करण्यासाठी ते एकत्र जमल्याचे समोर आले. या प्रकारामुळे मध्यरात्री सार्वजनिक शांततेचा भंग होऊन ध्वनिप्रदूषण होत असल्याने पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी बंटी ऊर्फ ओंकार साहेबराव जोगदंड, सुकेश भास्कर दांडेकर, आदित्य दसपुते, प्रवीण कवडे पाटील आणि वेदांत पाटील यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये, फटाके फोडू नयेत अथवा ध्वनिप्रदूषण टाळावे; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा क्रांती चौक पोलिस ठाण्यामार्फत देण्यात आला आहे.