(((प्रॉपर्टी टुडे)))
मिलेनियल्स, ‘जेन झी’ देणार रिअल इस्टेटला कलाटणी!
स्मार्ट होम, पर्यावरणपूरक बांधकाम, वर्क फ्रॉम होम आणि जीवनशैलीनुसार घरांच्या रचनेला प्राधान्य
योगेश पायघन ः सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : घर म्हणजे केवळ चार भिंती आणि छत, अशी व्याख्या आता मागे पडत आहे. घरातच कार्यालय, स्मार्ट उपकरणांद्वारे नियंत्रित होणाऱ्या सुविधा, व्यायामासाठी जागा, हिरवळ, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग आणि ऊर्जेची बचत अशा अनेक अपेक्षा नव्या पिढीच्या घरखरेदीतून पुढे येत आहेत. ‘मिलेनियल्स’ आणि ‘जेन झी’ या दोन पिढ्यांमुळे गृहबाजाराचे स्वरूप बदलत आहे.
जागतिक रिअल इस्टेट सल्लागार संस्था ‘जेएलएल’च्या अंदाजानुसार, सन २०३० पर्यंत देशातील नव्या घर खरेदीदारांमध्ये या दोन पिढ्यांचा एकत्रित वाटा सुमारे ६० टक्के असेल. त्यामुळे घरांची रचना, आकार, किंमत, परिसर आणि सुविधांबाबत विकसकांना नव्याने विचार करावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाढते शहरीकरण, औद्योगिक रोजगार आणि बदलती जीवनशैली पाहता या बदलांचे पडसाद स्थानिक गृहबाजारातही उमटत आहे. शहराचा विस्तार, औद्योगिक गुंतवणूक, शिक्षणसंस्था, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गृहबाजारात विविध प्रकारच्या घरांना वाव आहे. सिडको, हर्सूल, जालना रोड, बीड बायपास, सातारा-देवळाई आणि शेंद्रा, बिडकीन परिसरातील निवासी विकासाच्या संधींचा विचार करताना वेगवेगळ्या उत्पन्नगटांच्या गरजा लक्षात घेऊन गृहनिर्मिती प्रकल्प उभे राहत आहेत. शहरात स्थायिक होणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांना परवडणारी घरे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यावसायिकांना आधुनिक सुविधांनी युक्त सदनिका अपेक्षित असतील. त्याचवेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा आणि सामाजिक सुविधांचा प्रश्नही महत्त्वाचा राहील. केवळ क्लब हाऊस किंवा आकर्षक प्रवेशद्वार दाखवून ग्राहकांना आकर्षित करण्यापेक्षा प्रत्यक्ष वापरात येणाऱ्या सुविधा, देखभाल खर्च आणि परिसरातील पायाभूत सुविधा यावर विकसकांना भर द्यावा लागेल.
--------
भविष्यातील गृहप्रकल्पांमध्ये स्मार्ट तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधकाम, सामायिक कार्यक्षेत्रे, मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी सुरक्षित जागा, व्यायाम सुविधा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग व्यवस्था यांचा समतोल साधणे आवश्यक ठरणार आहे. एकूणच, नव्या पिढीच्या अपेक्षा समजून घेणारे आणि स्थानिक गरजांनुसार घरांची निर्मिती करणारे विकसकच आगामी गृहबाजारात टिकून राहतील, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
--------
गृहखरेदीचे गणित बदलणाऱ्या दोन पिढ्या
लोकसांख्यिक वर्गीकरणानुसार १९८१ ते १९९६ या काळात जन्मलेल्यांना मिलेनियल्स किंवा जेन वाय, तर १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेल्या पिढीला जेन झी म्हटले जाते. मिलेनियल्समधील मोठा वर्ग आता आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला असून, स्वतःचे पहिले घर, मोठे घर किंवा गुंतवणुकीसाठी दुसरे घर घेण्याकडे त्यांचा कल आहे. दुसरीकडे, जेन झीमधील प्रौढवर्गही नोकरी, व्यवसाय आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून कमाई करू लागला आहे. त्यामुळे घरखरेदीच्या बाजारात त्यांचा प्रवेश सुरू झाला आहे. २०३० पर्यंत नव्या घरखरेदीदारांमध्ये मिलेनियल्स आणि जेन झी यांचा एकत्रित वाटा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. हा अंदाज दोन्ही पिढ्यांचा एकत्रित आहे. गृहबाजारातील मागणीचा केंद्रबिंदू तरुण ग्राहकांकडे सरकत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
----------
घरापेक्षा जीवनशैलीला अधिक महत्त्व
पूर्वी घर खरेदी करताना क्षेत्रफळ, खोल्यांची संख्या, किंमत आणि स्थान यांना प्राधान्य दिले जात होते. नव्या पिढीच्या अपेक्षांमध्ये मात्र यापलीकडील बाबींचा समावेश झाला आहे. घरातून काम करण्याची सुविधा, स्वतंत्र कार्यकक्ष, उत्तम इंटरनेट जोडणी, स्मार्ट सुरक्षा व्यवस्था, मनोरंजनासाठी जागा आणि सामायिक सुविधांना महत्त्व दिले जात आहे. विशेषतः माहिती तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि स्टार्टअप क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी घर हे निवासस्थानासोबतच कामाचे ठिकाणही बनले आहे. त्यामुळे लहान क्षेत्रफळाच्या घरातही जागेचा योग्य वापर, बहुउपयोगी फर्निचर, पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि हवेशीर रचना यांची मागणी वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढत आहेत. ऑरिक, शेंद्रा, बिडकीन, वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रांतील रोजगारामुळे शहरात स्थायिक होणाऱ्या तरुण व्यावसायिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या वर्गाला कामाच्या ठिकाणापासून योग्य अंतरावर, वाहतुकीच्या सुविधा असलेले आणि आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत घर अपेक्षित असणार आहे.
----------
स्मार्ट होमपासून ग्रीन बिल्डिंगपर्यंत
घरातील दिवे, वातानुकूलन यंत्रणा, पडदे, सुरक्षा कॅमेरे आणि प्रवेश व्यवस्था मोबाइल किंवा आवाजाच्या आदेशाने नियंत्रित करण्याची सुविधा म्हणजे स्मार्ट होम. नव्या पिढीला अशा तंत्रज्ञानाचे आकर्षण आहे. मात्र, केवळ आकर्षक उपकरणांपेक्षा त्यातून मिळणारी सुरक्षितता, सोय आणि विजेची बचत यांनाही महत्त्व दिले जात आहे. त्याचवेळी पर्यावरणपूरक घरांची मागणी वाढत आहे. छतावरील सौरऊर्जा निर्मिती, पावसाच्या पाण्याचे संकलन, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे, नैसर्गिक वायुविजन आणि उष्णता कमी करणारी बांधकाम सामग्री यांचा विचार प्रकल्पांच्या नियोजनात होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात या सुविधांना विशेष महत्त्व आहे. इमारतीची रचना, खिडक्यांची जागा, सावली देणारी झाडे आणि उष्णतारोधक छत, पाण्याचा काटकसरीने वापर आणि पुनर्वापराच्या सुविधा भविष्यात घराच्या निवडीतील महत्त्वाचे निकष ठरणार असल्याचे विकासकांनी सांगितले.
------------
किरायापासून स्वतःच्या घरापर्यंत
‘जेन झी’मधील सर्वच तरुण तातडीने घर खरेदी करतील असे नाही. शिक्षण, नोकरीतील बदल, शहरांमधील स्थलांतर आणि उत्पन्नातील अनिश्चितता यामुळे काही तरुण किरायाने राहण्यास प्राधान्य देतील. विशेषतः करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यात घर खरेदीपेक्षा आर्थिक स्वातंत्र्य आणि बचतीला महत्त्व दिले जाऊ शकते. मात्र, स्थिर उत्पन्न, कर्जाची उपलब्धता आणि घराच्या किमती यांचा मेळ बसल्यास या वर्गातील काही जण लवकर गृहखरेदीकडे वळतील. त्यामुळे भविष्यात केवळ विक्रीसाठी घरे उभारण्याऐवजी भाडेकरूंना आकर्षित करणाऱ्या सुसज्ज सदनिका, सामायिक कार्यक्षेत्रे, सहनिवास (को-लिव्हिंग) आणि अल्पकालीन भाडे व्यवस्थापन यांसारख्या संधीही विकसकांसमोर निर्माण होत आहे.
------------
किंमत, कर्ज आणि विश्वासार्हतेची कसोटी
तरुण पिढीची आधुनिक घरांची अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष खरेदीचा निर्णय आर्थिक क्षमतेवरच अवलंबून असेल. घराच्या किमती, गृहकर्जाचा हप्ता, व्याजदर, देखभाल खर्च आणि नोकरीतील स्थैर्य या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. ‘कोलियर्स’च्या सप्टेंबरच्या होमबायिंग सेंटिमेंट सर्व्हेमध्ये ३० पेक्षा अधिक विकसित आणि उदयोन्मुख बाजारांतील सुमारे १,८०० संभाव्य घर खरेदीदारांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार ५० टक्के संभाव्य खरेदीदार पुढील दोन वर्षांत घर घेण्यास इच्छुक असून सुमारे ३१ टक्के प्रतिसादकर्त्यांनी घर खरेदीतील प्रमुख अडथळा म्हणून किंमत आणि परवडणारी क्षमता नमूद केली. ६२ टक्के ग्राहकांनी दोन किंवा तीन बीएचके घरांना पसंती दिली, तर ४६ टक्के ग्राहकांचा कल ५० लाख ते दीड कोटी रुपयांच्या घरांकडे असल्याचे सर्वेक्षणात आढळले. विशेष म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी तयार किंवा बांधकाम पूर्णत्वाच्या जवळ असलेल्या घरांना पसंती दर्शविली. यातून तरुण ग्राहकांसाठी आकर्षक सुविधा देण्याबरोबरच घराची किंमत, बांधकामाचा दर्जा, ताब्याची निश्चितता आणि विकसकाची विश्वासार्हता यांना तितकेच महत्त्व असल्याचे स्पष्ट होते.
----------
प्रकल्प नव्हे, अनुभव विकण्याचे आव्हान
१) मिलेनियल्स आणि जेन झी या पिढ्यांसाठी घर खरेदी हा केवळ मालमत्ता निर्माण करण्याचा निर्णय राहिलेला नाही. घरातून मिळणारी जीवनशैली, काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल, परिसरातील सुविधा, सुरक्षितता आणि भविष्यातील मालमत्तेचे मूल्य यांचा एकत्रित विचार केला जात आहे. त्यामुळे विकसकांनी ग्राहकांच्या गरजेनुसार घरांची रचना करणे आवश्यक आहे.
२) छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार आणि नव्या रोजगारसंधी लक्षात घेता तरुण नोकरदार, व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी वेगवेगळ्या किमतींचे पर्याय उपलब्ध करावे लागतील. प्रत्येक ग्राहकाला महागड्या सुविधा हव्या असतातच असे नाही. त्याला परवडणारी किंमत, चांगला बांधकाम दर्जा, पुरेसे पार्किंग, पाणी, सुरक्षा आणि दैनंदिन गरजांच्या सुविधा अधिक महत्त्वाच्या वाटू शकतात.
३) पुढील काळात विकसकांसाठी तीन बाबी निर्णायक ठरतील. पहिली म्हणजे ग्राहकांच्या उत्पन्नानुसार परवडणारी घरे, दुसरी म्हणजे प्रत्यक्ष उपयोगी आधुनिक सुविधा आणि तिसरी म्हणजे बांधकाम व ताब्याबाबत पारदर्शकता. स्मार्ट होम आणि ग्रीन बिल्डिंग यांसारख्या संकल्पना राबविताना त्यांचा अतिरिक्त खर्च ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल.
----------
जेन झी आणि मिलेनियल्सचे गृहबाजारातील नवे गणित
६० टक्के ः २०३० पर्यंत नव्या घरखरेदीत दोन्ही पिढ्यांचा अपेक्षित एकत्रित वाटा
-------
६२ टक्के ः दोन आणि तीन बीएचकेला पसंती
-----
५० टक्के ः पुढील दोन वर्षांत घर घेण्यास इच्छुक
----
६० टक्के ः तयार किंवा बांधकाम पूर्णत्वाच्या जवळील घरांना पसंती
(सर्वेक्षणातील निरीक्षण)
------
घरखरेदीतील बदलते प्राधान्यक्रम
- स्मार्ट होम आणि डिजिटल सुरक्षा
- वर्क फ्रॉम होमसाठी स्वतंत्र जागा
- सौरऊर्जा आणि पाणी पुनर्वापर
- इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग
- हिरवळ आणि सामायिक कार्यक्षेत्र
- परवडणारी किंमत आणि निश्चित ताबा
--------------------
एक्स्पर्ट ओपीनीयन
पाच तारांकित हॉटेलसारख्या सुविधा आणि दर्जेदार व्यवस्थापनाची अपेक्षा आता गृहप्रकल्पांमध्येही वाढत आहे. विशेषतः मिलेनियल्स, जेन झी आणि तरुण नोकरदारवर्गाला आधुनिक सुविधा, स्मार्ट तंत्रज्ञान, मनोरंजनाची साधने आणि आरामदायी जीवनशैली हवी आहे. या सुविधा देताना देखभाल खर्च आणि आर्थिक नियोजनात सुविधा, अपेक्षांना प्राधान्य मिळतांना दिसते. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकमधील गृहप्रकल्पांसारखे मोजके प्रकल्प संभाजीनगरातही झाले. तशाच उपयुक्त सुविधांचे अपग्रेडेशन करण्याकडे कल वाढत आहे. भविष्यात अशा सुविधांनी युक्त, दर्जेदार आणि परवडणाऱ्या घरांना ग्राहकांकडून चांगली मागणी राहील. त्यावर मिलेनिअल्स, जेन झीच्या अपेक्षांची छाप दिसेल.
- अचित भारुका, संचालक, आर्च डेव्हलपर्स आमि शक्ती लाइफ स्पेसेस