मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांची
उद्यापासून ‘काम बंद’ची हाक
-------
आश्वासनांची पूर्तना न केल्याचा संघटनेचा आरोप
-------
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ३१ ः वसुली मोठ्या प्रमाणात होत असतानाही महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने सोमवार (ता. दोन) पासून पुन्हा काम बंद आंदोलनाचा निर्णय महापालिका अधिकारी, कर्मचारी संघटनेने घेतला आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून सफाई कामगार, कर्मचारी संघटनाही आंदोलनात सहभागी होणार आहे.
राज्य पालिका, नगरपंचायत, महापालिका अधिकारी कर्मचारी-संघटनेच्या परभणी शाखेतर्फे जीएसटीचे थकीत व चालू वाढीव अनुदानाच्या मागणीसाठी १० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत काम बंद आंदोलन केले होते. ११ सप्टेंबरला प्रशासनासोबत झालेल्या वाटाघाटीअंती प्रशासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिले होती, की तत्काळ दोन वेतन अदा करण्यात येतील व पुढील ३० दिवसांत उर्वरित तीन वेतन दिले जातील. परंतु, तसे काही झाले नाही. सोबतच काम बंद आंदोलन काळातील ३२ दिवसांची सेवा अर्जित रजेत समाविष्ट करून त्या महिन्याचे वेतन अदा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिलेले ३० दिवसांचे आश्वासन ६० दिवस झाले, तरी तीन वेतन देण्यात आले नाही. सोबतच अर्जित रजेचा विषयही प्रलंबितच ठेवण्यात आला आहे. यामुळे संघटना पदाधिकाऱ्यांनी २१ ऑक्टोबरला आयुक्त नार्वेकरांना निवेदन देऊन लेखी आश्वासनाची पूर्तता करावी व दीपावलीसाठी दोन वेतन द्यावेत, वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार रुपये अग्रीम, तर वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांसाठी १५ हजार रुपये अग्रीम दोन नोव्हेंबरपर्यंत देण्याची मागणी निवेदनात केली. परंतु, त्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, असे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी म्हटले. त्यामुळे शनिवारी (ता. ३१) संघटनेचे अध्यक्ष नासेर खान यांच्या निवासस्थानी संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यामुळे पुन्हा दोन नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. सर्व विभागांतील कर्मचारी सोमवारपासून काम बंद आंदोलनात सहभागी होऊन महापालिका मुख्यालयासमोर धरणे देणार आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असे संघटनेचे अध्यक्ष नासीर खान यांनी म्हटले आहे. या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे अध्यक्ष नासीर खान, राज्य उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, उपाध्यक्ष विनायक ठाकूर, कोषाध्यक्ष मोईन खान, सचिन विशाल उफाडे, कार्याध्यक्ष मनोज तळेकर, सहसचिव भागवत कडनोर, संघटक प्रकाश गायकवाड, समन्वयक राजाभाऊ मोरे, दीपक कानोडे, लिंबाजी बनसोडे, मदन शहाणे, राजीव देशमुख, सीताबाई तांबे, शोभाबाई सालगुडे, लक्ष्मण जोगदंड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
---------
सफाई कामगारांचाही पाठिंबा
महापालिका अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या आंदोलनास महापालिका सफाई कामगार व कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा अनुसयाबी जोगदंड, सचिव के.के. भारसाकळे यांनी पाठिंबा दिला आहे. या संपात सफाई कामगार संघटनादेखील सहभागी होणार असल्याची माहिती भारसाकळे यांनी दिली.