कारभारात हवी सुधारणा; तर
करा महापालिकेला सूचना
--
‘सुधारणा उत्सव’ अभियानात ३१ ऑक्टोबरपर्यंत संधी
--
छत्रपती संभाजीनगर, ता. १६ : महापालिकेच्या विविध सेवांसाठी नागरिकांना माराव्या लागणाऱ्या चकरा आणि प्रक्रियेतील विलंबाविषयी तक्रार असेल, तर त्यात आता सुधारणा होऊ शकते. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ‘सुधारणा उत्सव २०२६’ हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्यक्ष कामकाजात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आवश्यक असणाऱ्या सुधारणांबाबत महापालिकेने ३१ ऑक्टोबरपर्यंत थेट नागरिकांकडूनच सूचना व शिफारसी मागविल्या आहेत.
सामान्य नागरिकांना महापालिकेतून विविध दाखले, परवानग्या किंवा सेवा मिळवताना अनेक प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर नागरिककेंद्रित सुधारणा घडवून आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कामाच्या प्रक्रियेत लागणाऱ्या अनावश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, मंजुरीच्या क्लिष्ट पायऱ्या आणि कालबाह्य नियम रद्द करणे, विभागांमधील समन्वय वाढवून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन व डिजिटल करणे, यासारख्या बाबींवर भर दिला जाणार आहे. नागरिकांना महापालिकेच्या सेवांबाबत वाटणाऱ्या त्रुटी आणि त्यावर सुचवायचे उपाय ३१ ऑक्टोबरपर्यंत contact@chhsambhajinagarmc.org या ई-मेलवर पाठवता येतील. याशिवाय महापालिका मुख्यालयातील समन्वय विभागात प्रत्यक्ष जाऊनही लेखी स्वरूपात सूचना सादर करण्याची सोय करण्यात आली.
---
(((कोट)))
नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणी व सुधारणांबाबत आपल्या सूचना नोंदवाव्यात. प्राप्त सूचनांचा शासननिर्णयानुसार गांभीर्याने विचार करून कारभारात सकारात्मक बदल केले जातील.
- अमोल येडगे, आयुक्त, महापालिका