व्याज वाढले ०.१५ टक्क्यांनी, भार सव्वा कोटीचा
--------
पाणीपुरवठा योजनेतील कर्जापोटी महापालिकेला आर्थिक फटका
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १४ ः शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेत स्वहिस्सा टाकण्यासाठी ८२२.२२ कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेने हुडको व महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून घेतले आहे. त्यावर सुरवातीला ८.७५ टक्के व्याजाची आकारणी केली जात होती; पण रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात वाढ झाल्यामुळे ०.१५ टक्के व्याज वाढविण्यात आले आहे. त्याचा आर्थिक फटका महापालिकेला बसला आहे. सध्या उचललेल्या १९३ कोटीच्या रकमेवर आता वर्षाकाठी एक कोटी २३ लाख रुपयांचे व्याज महापालिकेला भरावे लागणार आहे.
केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत शहराची २७४० कोटी रुपायांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यात केंद्र शासनाचा हिस्सा ६८५.१९ कोटी, राज्याचा १२३३.३४ कोटी, तर महापालिकेचा ८२२.२२ कोटी रुपये एवढा हिस्सा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासनाने ८२२.२२ कोटी रुपयांचे कर्ज हुडको व महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून उपलब्ध करून दिले आहे. या कर्जाचा हप्ता २०२८ पासून सुरू होणार आहे. असे असले तरी उचल केलेल्या रकमेवर व्याज भरावे लागणार आहे. आतापर्यंत महापालिकेने ८२२.२२ कोटीपैकी १९३ कोटी रुपये घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मागणीनुसार कंत्राटदाराला दिले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात वाढ झाल्याने हुडको व महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीने ०.१५ टक्क्यांनी व्याज वाढविण्यात आले आहे. ८.९० टक्के एवढ्या व्याज दरवाढीला शुक्रवारी (ता. १३) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. ०.१५ टक्के दराने व्याज वाढले असल्याने सध्या घेतलेल्या १९३ कोटींच्या रकमेवर वर्षाला तब्बल एक कोटी २३ लाख रुपयांचे व्याज वाढणार आहे. या प्रस्तावाला शुक्रवारी महापौर समीर राजूरकर यांनी मंजुरी दिली.
-------
३१ कोटी रुपयांची मागणी
राज्य व केंद्र शासनाने स्वहिश्श्याची रक्कम महापालिकेला दिली आहे. त्यामुळे उर्वरित कामे महापालिकेच्या ८२२.२२ कोटींच्या हिश्श्यातून केली जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत बिलाची मागणी केली जाते. त्यानुसार महापालिका कर्जाची उचल करून बिल अदा करते. १९३ कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आले आहेत. आणखी ३१ कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
------
२०२८ पासून सुरू होणार हप्ता
आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर ८२२.२२ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा वाढला आहे. यापूर्वीच महापालिकेने स्मार्ट सिटीचा स्वहिस्सा भरण्यासाठी २५० कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते, या कर्जाचा हप्ता फेडताना नाकीनऊ येत असताना ८२२.२२ कोटी रुपयांच्या कर्जाचा २०२८ पासून महिन्याला किमान दहा कोटी रुपयांपर्यंत प्रत्येक महिन्याला हप्ता भरावा लागणार आहे.