डीजे, बँजोला कायमचा ‘नो’
- मुस्लिम समाजबांधवांकडून सामाजिक शिस्तीचा नवा पायंडा
- उल्लंघन केल्यास नमाज-ए-जनाजामध्ये सहभागी न होण्याचा इशारा
धाराशिव, ता. १५ (बातमीदार) : शहरातील कोणत्याही कार्यक्रमात डीजे किंवा बँजो वाजवायचा नाही, असा ठाम निर्धार शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी बैठकीत केला आहे. केवळ एखाद्या कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, सर्व कार्यक्रमांमध्ये या वाद्यांचा वापर टाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक आणि सामाजिक परंपरांना महत्त्व देत समाजात शिस्त, शांतता, जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने शहरातील मुस्लिम समाजाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्याच्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्यास नमाज-ए-जनाजामध्ये सहभागी न होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे.) दर्गा येथे मंगळवारी (ता. १३) मुस्लिम समाजाची बैठक पार पडली. यावेळी शहरातील उलेमा, मौलाना, सामाजिक नेते, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना डीजे आणि बँजोच्या वापराचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर या वाद्यांना कार्यक्रमांमधून पूर्णपणे वगळण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. अनेक सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये या वाद्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, शहरातील मुस्लिम समाजाने या प्रथेला नकार देण्याची भूमिका घेतली आहे. कोणताही कार्यक्रम, उत्सव किंवा सामाजिक आयोजन असो, त्यामध्ये डीजे आणि बँजो वाजवायचा नाही, असा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
या भूमिकेमागे केवळ वाद्यांचा वापर थांबविणे एवढाच उद्देश नसून, समाजातील धार्मिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांच्या अन्य अडचणींचा विचार करण्याची भावना असल्याचे बैठकीत सर्वानुमते मांडण्यात आले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने या निर्णयाचे पालन करावे आणि सामूहिकरीत्या घेतलेल्या भूमिकेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे समाजातील कार्यक्रम साजरे करताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. समाजाने स्वतःहून काही नियम स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करावी आणि समाजापुढे आदर्श ठेवावा, असेही मत व्यक्त करण्यात आले.