थेट बांधावर जाऊन नानांनी पुसले अश्रू
‘शांतीवन’चा आधारवड कोसळला; निधनाने जिल्ह्यात शोककळा
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ८ ः आता आमची हुरडा पार्टी कोणासोबत होणार? आमच्या पाठीवर मायेची थाप कोण मारणार? असा काळजाचा ठोका चुकवणारा टाहो आर्वीच्या शांतीवनमधील शेकडो अनाथ लेकरांनी फोडला. तर दुसरीकडे, तुम्ही अजिबात एकटे नाही, तुमचा हा भाऊ जिवंत असेपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द देणारा आपला पाठीराखा अचानक निघून गेल्याने बीडच्या दुष्काळी मातीतल्या शेतकरी कुटुंबांचा आधारच हिरावला गेला आहे.
रुपेरी पडद्यावर आपल्या आक्रमक संवादांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि थोर समाजसेवक नाना पाटेकर (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. पडद्यावर अत्यंत कडक वाटणारा हा ‘नटसम्राट’ खऱ्या आयुष्यात बीडकरांसाठी अत्यंत हळवा आणि संवेदनशील होता.
------
२०१४ ची पहिली भेट आणि अनाथ मुलांचे बदललेले नशीब
नाना पाटेकर २०१४ मध्ये पहिल्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतीवन या सामाजिक संस्थेला त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह भेट दिली. ऊसतोड कामगार, वंचित आणि अनाथ मुलांचे हाल पाहून त्यांचे संवेदनशील हृदय हेलावले. त्यांनी केवळ कोरडी सहानुभूती दाखवली नाही, तर लागलीच प्रत्यक्ष कृती केली. पुढाकार घेऊन संस्थेत तब्बल २०० मुला-मुलींच्या निवासासाठी एक भव्य वसतिगृह उभे करून दिले. शांतीवनचे संस्थापक दीपक नागरगोजे आणि कावेरी नागरगोजे यांच्या पाठीवर नानांनी मारलेली शाबासकीची थाप सामाजिक चळवळीला नवसंजीवनी देऊन गेली.
------
‘नाम’च्या माध्यमातून बीडच्या दुष्काळावर थेट प्रहार
२०१५ मध्ये ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना झाल्यानंतर नानांसाठी बीड जिल्हा कधीच परका राहिला नाही. बीडमधील भीषण दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या बळिराजाच्या कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी ते सतत धावून आले. केवळ व्यासपीठावरून भाषणे न ठोकता, हातात कुदळ-फावडे घेऊन जलसंधारणाच्या कामात स्वतः उतरणारा हा अवलिया बीडकरांनी पाहिला. नद्यांचे खोलीकरण आणि नाल्यांचे रुंदीकरण नानांमुळे शक्य झाले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या विधवा माता-भगिनींना आर्थिक मदतीचा धनादेश देताना नानांचे डोळे अनेकदा पाणावले होते.
----
बीडकरांचा लाडका ‘नाना’
नानांना बीडच्या मातीचे आणि शांतीवनमधील मुलांचे प्रचंड वेड होते. दरवर्षी हिवाळ्यात शांतीवनमधील लहानग्यांसोबत हुरडा पार्टी साजरी करण्यासाठी ते मुंबईतील व्यस्त शूटिंग सोडून आवर्जून वेळ काढत असत. येथे आल्यावर ते कोणतीही ''व्हीआयपी'' वागणूक घेत नसत. साध्या कपड्यांमध्ये जमिनीवर बसून मुलांशी गप्पा मारणे, त्यांना स्वतःच्या हाताने हुरडा भरवणे आणि त्यांच्या सुख-दुःखात समरस होणे, हा त्यांचा स्वभाव होता. बीडचा ज्वारीचा हुरडा आणि रांगड्या माणसांचा पाहुणचार त्यांना मनापासून आवडायचा.
-----
माणुसकीचे कधीही न तुटणारे पक्के बांध घातले
नाना पाटेकर यांनी बीडमध्ये केवळ सिमेंटच्या इमारती किंवा पाण्याचे बांध घातले नाहीत, तर त्यांनी येथील दुष्काळग्रस्त जनतेच्या मनात स्वाभिमान, जिद्द आणि माणुसकीचे कधीही न तुटणारे पक्के बांध घातले. आज शांतीवनमधील लेकरे आणि दुष्काळी मातीत राबणारा बळिराजा एकाच वेळी पोरका झाला असला तरी, बीडच्या मातीचा हा ‘नाना’ बीडकरांच्या स्मरणात कायम अमर राहील.
----
कोट
नाना आपल्यात नाहीत, हे मन स्वीकारायलाच तयार नाही. २०१४ च्या दुष्काळात त्यांनी मकरंददादांसोबत शांतीवनला भेट दिली आणि आमच्या कामाला एक वेगळीच ताकद मिळाली. त्यांनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर अनाथ मुलांसाठी २०० क्षमतेचे वसतिगृह बांधून देत हक्काचा निवारा दिला. नामच्या माध्यमातून शांतीवनमधून पहिली मदत सुरू केली. मुलांचे शिक्षण असो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना शिलाई मशीन देणे असो, की जलसंधारणासाठी पोकलेन देणे असो, नाना प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. दिप्या, तू करत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा शब्द आम्हाला जगण्याची उमेद द्यायचा. नाना, तुम्हाला श्रद्धांजली वाहण्याचे धाडस माझ्यात नाही. पण तुम्ही दिलेली माणुसकीची ज्योत आम्ही कधीही विझू देणार नाही.
- दीपक नागरगोजे, संस्थापक अध्यक्ष, शांतीवन