दुष्काळात माणुसकीचा दीप बनून आले नाना!
---------
-जिल्ह्यात जपल्या जाताय पाटेकरांच्या माणुसकीच्या आठवणी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ८ ः दुष्काळाने होरपळलेली शेती, पाण्यासाठी वणवण भटकणारी माणसे, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी, आत्महत्येने उद्ध्वस्त झालेली कुटुंबं, अशा वेदनादायी काळात जिल्ह्यातील अनेक गावांच्या मदतीला एक संवेदनशील व्यक्ती धावून आली. ती व्यक्ती होती अभिनेते नाना पाटेकर. पडद्यावर अनेक भूमिका साकारणारे नाना प्रत्यक्ष आयुष्यात मात्र माणुसकीची भूमिका जगले.
‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात केवळ मदतीचा हात दिला नाही, तर संकटातून उभे राहण्याची उमेद दिली. परभणी जिल्ह्यातील अनेक गावांत जलसंधारणाची कामे उभी राहत असताना नानांच्या प्रयत्नांची आठवण आजही ग्रामस्थांच्या मनात ताजी आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटी घेताना नानांनी केवळ मदत केली नाही, तर त्या कुटुंबांचे दुःख जवळून अनुभवले. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील सुमारे २३० कुटुंबांना त्यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. १५ हजारांचे धनादेश, ब्लँकेट, कपडे आणि वैद्यकीय साहित्य देताना त्यांच्या मनात प्रसिद्धीचा विचार नव्हता; होता तो केवळ संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचा. पती गमावलेल्या महिला, वडिलांच्या छत्राला मुकलेली मुले, कर्जाच्या विवंचनेत अडकलेली कुटुंब पाहताना नानांच्या संवेदनशील मनालाही वेदना झाल्या. त्या वेदनेतूनच मदतीचा हा प्रवास अधिक व्यापक होत गेला. आज काळ बदलला आहे. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे उभी आहेत. काही शिवारांमध्ये पुन्हा हिरवाई दिसते. पण या बदलाच्या आठवणी सांगताना ग्रामस्थांच्या बोलण्यात नानांचे नाव आदराने येते. कारण नाना पाटेकर केवळ मदत करण्यासाठी नाही, तर दुःख समजून घेण्यासाठी आले होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या घरातील चूल पाहिली, त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहिले आणि त्या पाण्याला आशेची किनार देण्याचा प्रयत्न केला. परभणीच्या मातीने अनेक माणसे पाहिली. मात्र, संकटाच्या काळात हातात हात देऊन उभे राहणाऱ्या ‘नानां’ची आठवण मात्र या मातीच्या स्मरणात कायम राहील.
---
तहानलेल्या जमिनीस दिला जगण्याचा श्वास
जिल्ह्यातील गावांत नाले, ओढे आणि नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते जमिनीत मुरावे, विहिरींना पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा हिरवाई यावी, हा या कामामागचा उद्देश होता. जलसाठ्यांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये टाकण्यात आला. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली. शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यास हातभार लागला. तहानलेल्या मातीत पाण्याचा थेंब मुरताना पाहणे, हेच नानांच्या या कार्याचे खरे समाधान होते.
---
(((कोट)))
नानांच्या जाण्याने मन सुन्न झाले. अभिनयाच्या पलीकडे जाऊन शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसासाठी जगणारा संवेदनशील माणूस आपण गमावला आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव घेताना त्यांचा दिलखुलास स्वभाव, माणुसकी, समाजासाठीची तळमळ जवळून अनुभवली. मला प्रेमाने ‘कांता’ म्हणणाऱ्या नानांच्या त्या आपुलकीच्या आठवणी कायम मनात राहतील.
- कांतराव देशमुख - झरीकर,
प्रगतिशील शेतकरी, परभणी
-----------
((कोट)))
१९९४ मध्ये डी.एड. करताना परभणीहून पळून जाऊन मुंबईच्या अंधेरी येथील फ्लॅटवर मी या माणसाला भेटलो होतो. ‘बापून्या गावाकडे जाय अन् मास्तर होय’, असे या माणसाने मला सांगितले. पण मास्तर झाल्यावर कधीच भेट झाली नाही आमची. हा माणूस अभिनयातला, लेखनातला, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामे करताना खऱ्या अर्थाने ‘क्रांतिवीर’ होता. या सामान्य जगातून हा असामान्य ‘परिंदा’ निघून गेला. त्यांना आमुचा अखेरचा रामराम
- अरुण चव्हाळ,
शिक्षक, परभणी
--------------
((कोट)))
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद, मन सुन्न करणारी आहे. ते महान अभिनेते तर होतेच. पण माणूस म्हणूनही अत्यंत स्नेही, आपुलकीचे होते. त्यांच्याशी असलेला माझा स्नेह आणि त्यांच्या अनेक आठवणी कायम मनात राहतील. नाम फाउंडेशनच्या कार्यातून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. असा जिवलग मित्र आणि स्नेही गमावल्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.
-उदय वाईकर,
सिनेगायक, परभणी
-----------------------