कचरा संवेदनशील जागेचे झाले ‘बोनसाई उद्याना’त रूपांतर

कचरा संवेदनशील जागेचे झाले ‘बोनसाई उद्याना’त रूपांतर
Published on: 
कचरा संवेदनशील जागेचे झाले ‘बोनसाई उद्याना’त रूपांतर --- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ४ : कचरा साचणाऱ्या जागेकडे दुर्लक्ष न करता तिचे नियोजनबद्ध पद्धतीने सुशोभीकरण करून आकर्षक ‘बोनसाई उद्याना’त रूपांतर करण्याचा उपक्रम नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने राबविला. स्वच्छता ही सेवा २०२६ अभियान आणि स्वच्छ भारत दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २) हा उपक्रम राबविण्यात आला. नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय परिसरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या फेरीत अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सी. एच. कल्याण राजू, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. के. श्रीनिवासा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, रेल्वे कर्मचारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. --- कचऱ्याच्या जागेला हिरवाईची किनार डीआरएम कार्यालय संकुलातील कचरा संवेदनशील ठिकाणाची नियोजनबद्ध स्वच्छता करून तेथे लँडस्केपिंग, वृक्षारोपण आणि सुशोभीकरण करण्यात आले. या माध्यमातून या जागेचे सुंदर बोनसाई उद्यानात रूपांतर करण्यात आले. त्यामुळे पूर्वी कचरा व टाकाऊ साहित्य जमा होण्याची शक्यता असलेल्या जागेला आता हिरवाईने नटलेल्या आकर्षक परिसराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कचरा संवेदनशील ठिकाणांचे अशा पद्धतीने रूपांतर केल्यास रेल्वे परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. --- स्वाक्षरी अभियानातून बांधिलकी स्वच्छता फेरीनंतर वृक्षारोपण आणि स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. अधिकारी, कर्मचारी तसेच सहभागी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ भारताच्या संकल्पनेप्रती बांधिलकी व्यक्त केली. नांदेड विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, पूर्णा, आदिलाबाद आदी ठिकाणीही स्वच्छता फेरी, स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे अधिकारी-कर्मचारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, स्काऊट्स अँड गाइड्‌स तसेच एनसीसी कॅडेट्स यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com