NND26B03594 नांदेड : समाज कल्याण विभागाकडे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्जांचा साचलेला ढीग.
----
जात पडताळणी समितीवर अर्जांचा वाढता भार
---
प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अधिकाऱ्यांची दमछाक
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. ८ : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समाज कल्याण विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जांचा मोठा ढीग साचला आहे. विद्यार्थी, शासकीय नोकरीतील उमेदवार तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून दररोज पाचशेहून अधिक अर्ज दाखल होत असल्याने समितीवरील कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या अर्जसंख्येमुळे प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रम, सरकारी नोकरी व विविध शासकीय योजनांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यात निवडणुकांची भर पडल्याने अर्जांची संख्या वाढली आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तातडीने अर्ज दाखल केले जात आहेत. नवीन अर्जांसोबत जुन्या प्रकरणांची छाननी, कागदपत्रांची पडताळणी, त्रुटींची पूर्तता, सुनावणी व अंतिम निर्णयाची प्रक्रिया समितीला करावी लागत आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत कामाचा भार वाढल्याने अतिरिक्त कर्मचारी व स्वतंत्र यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे.
---
((कोट))
जात पडताळणी समितीकडे उपलब्ध झालेल्या फायली अनुक्रमानुसार निकाली काढल्या जात आहेत. यामध्ये बारावी, इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फायलींचा समावेश आहे. त्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे काम सुरू आहे.
-डॉ. छाया कुलाल, उपायुक्त, जात पडताळणी समिती, नांदेड.