‘जैसे थे’ आदेशाचे उल्लंघन
---
महापालिका आयुक्तांसह चौघांविरुद्ध अवमान याचिका
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २२ : न्यायालयाने मालमत्तेबाबत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही जेसीबीच्या साहाय्याने नाली खोदण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत पुष्पनगरी येथील मालमत्ताधारक सुधाकर गोपीनाथराव टाक यांनी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
टाक यांच्या याचिकेनुसार, पुष्पनगरी येथील सर्वे क्रमांक ६४ आणि महापालिका मालमत्ता क्रमांक १/७/४८८/१ या जागेच्या मालकी व ताब्यावरून न्यायालयात वाद सुरू आहे. या मालमत्तेबाबत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी एमसीए क्रमांक ८७/२०२५ या प्रकरणात संबंधित पक्षकारांना ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, ३० सप्टेंबर रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि मजुरांसह मालमत्तेत प्रवेश करून नाली खोदण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप टाक यांनी केला आहे. यावेळी न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवूनही कारवाई सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार करूनही कारवाई थांबविण्यात आली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांना सहा महिन्यांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा द्यावी, तसेच त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणून तिचा लिलाव करावा, अशी मागणी सुधाकर गोपीनाथराव टाक यांनी अवमान याचिकेत केली आहे. या आरोपांवरील न्यायालयीन निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नसून, प्रकरणातील पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.
----
आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह चौघांविरुद्ध आरोप
या याचिकेत महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त अजितपालसिंह संधू आणि शहर अभियंता सुमंत पाटील यांच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला आहे. देवकर यांच्या जेसीबीचा वापर करून नाली खोदण्याचा प्रयत्न झाल्याचाही उल्लेख याचिकेत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती स्वीकारण्यात आली नाही, तसेच पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा दावाही टाक यांनी केला आहे. या प्रकरणाशी संबंधित विशेष दिवाणी दावा क्रमांक ३१/२०२५ न्यायालयात प्रलंबित आहे.