जनरल डब्यांऐवजी सेकंड क्लास चेअर कार
---
नांदेड विभागांतर्गत धावणाऱ्या चार रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल, लवकरच अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १६ : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत धावणाऱ्या चार रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे. सध्या या गाड्यांना जोडण्यात येणाऱ्या जनरल सेकंड क्लास डब्यांऐवजी आता सेकंड क्लास चेअर कार प्रकारचे डबे जोडण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांच्या प्रवास सुविधांमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
सध्या संबंधित रेल्वेगाड्यांना १४ जनरल सेकंड क्लास (जीएस) आणि दोन लगेज-कम-ब्रेक व्हॅन (एसएलआर) असे एकूण १६ डबे जोडले जातात. सुधारित संरचनेनुसार जनरल डब्यांच्या जागी १४ सेकंड क्लास चेअर कार (डब्ल्यूजीएससीझेड) डबे जोडण्यात येतील. एसएलआरचे दोन डबे कायम राहणार असून, गाड्यांची एकूण डब्यांची संख्या १६ इतकीच राहणार आहे. तसेच पारंपरिक आयआरएस प्रकारच्या डब्यांऐवजी सीबीसी प्रकारचे डबे वापरण्यात येणार आहेत.
----
या चार रेल्वेगाड्यांमध्ये बदल
नांदेड–मनमाड–नांदेड (५७६५१/५७६५२) : नांदेडहून १९ नोव्हेंबर आणि मनमाडहून २० नोव्हेंबरपासून नवीन संरचना लागू होईल.
-पूर्णा–आदिलाबाद–परळी वैजनाथ (५७६५३/५७६५४) : पूर्णा येथून २० नोव्हेंबर आणि आदिलाबाद येथून २१ नोव्हेंबरपासून बदल होईल.
-परळी वैजनाथ–अकोला–पूर्णा (५७६५५/५७६५६) : परळी वैजनाथ येथून २१ नोव्हेंबर आणि अकोला येथून २२ नोव्हेंबरपासून नवीन डबे जोडले जातील.
-पूर्णा–परळी वैजनाथ–पूर्णा (५७६५७/५७६५८) : दोन्ही दिशांनी २२ नोव्हेंबरपासून सुधारित संरचना लागू होईल. या बदलांच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने दिली.
----