नांदूरघाट ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचे उपोषण
बीड, ता. २ : घोटाळे आणि कथित वसुलीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेली नांदूरघाट ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे प्रत्यक्षात न करताच कुशल व अकुशल कामाची रक्कम उचलल्याचा आरोप करीत शेतकरी अमोल जाधव, नितीन जाधव आणि अमोल सखाराम जाधव सोमवार (ता. ३१) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
मागील चार वर्षांपासून रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे प्रत्यक्षात न करता कुशल व अकुशल कामाची पूर्ण रक्कम उचलून अपहार केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने विहिरींची कामे बोगस असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, गावातील टोरंटो सौरऊर्जा प्रकल्पाकडून ग्रामपंचायतीने किती कर वसूल केला, प्रकल्पासाठी नाहरकत दाखला देताना सूचक-अनुमोदक कोण होते आणि कंपनीकडून मिळालेल्या सीएसआर निधीचा वापर कुठे करण्यात आला, याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनाही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बोगस विहिरींच्या कामातील दोषींवर गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करावी, सौरऊर्जा कंपनीकडून वसूल केलेला कर आणि सीएसआर निधीच्या वापराची चौकशी करावी, अनुपस्थित ग्रामसेवक व रोजगार सेवकांवर कारवाई करून रखडलेली विकासकामे सुरू करावीत, या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.