जिल्ह्यात आज राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
--------------
-१ ते १९ वयोगटातील बालकांना गोळ्यांचे वाटपाचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २६ ः जिल्ह्यातील बालक, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राखणे, रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मंगळवारी (ता. २७) राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील पात्र बालकांना एकाच दिवशी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील २ हजार ११९ शाळा आणि १ हजार ९२४ अंगणवाड्यांच्या माध्यमातून औषधवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेत किंवा अंगणवाडीत न जाणाऱ्या पात्र बालकांनाही आरोग्य संस्थांच्या माध्यमातून मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. आतड्यांतील जंतांच्या संसर्गामुळे शरीरातील पोषक घटकांचे शोषण कमी होऊन रक्तक्षय, अशक्तपणा, भूक मंदावणे तसेच शारीरिक आणि बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जंतनाशक औषधोपचारामुळे हा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. मोहिमेच्या दिवशी औषध घेता न आलेल्या पात्र बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा. बालकाच्या प्रकृतीबाबत काही समस्या असल्यास औषध देण्यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यातील पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि नागरिकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांनी केले आहे.
-----