आडूळ येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान; १७६ लाभार्थ्यांनी घेतला सहभाग
आडूळ, ता. २४ (बातमीदार) ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आडूळ बुद्रुक येथे राष्ट्रीय पोषण आहार अभियान राबविण्यात आले. यावेळी गरोदर व स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुलींना समतोल आहाराचे महत्त्व, असंतुलित आहाराचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात ‘तिशीचा पल्ला’ तपासणी व सल्ला मोहिमेबाबतही माहिती देण्यात आली. तसेच मासूम संस्थेअंतर्गत उडान प्रकल्पाच्या माध्यमातून पैठण व गंगापूर तालुक्यात सुरू असलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधाच्या कामाची माहिती देण्यात आली. मारहाणीसोबतच अपमान, टोमणे, आर्थिक नियंत्रण, घराबाहेर जाण्यास प्रतिबंध आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी न करून घेणे, हेही कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात डॉ. दीक्षा जिने, डॉ. नेहा पटेल, लॅब टेक्निशियन स्वाती म्हात्रे, उडान प्रकल्पाच्या समुपदेशक वंदना सुरवसे यांच्यासह सविता पिवळ, गौरी काळे, अश्विनी जैन, वंदना आरख व शकिला आतार उपस्थित होत्या. एकूण १७६ लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.