एकतेचा संदेश देत धावले शेकडो पाय
पारध पोलिसांचा पुढाकार; राष्ट्रीय एकता दौडीत तरुणांसह महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांचा सहभाग
धावडा, ता. ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून पारध पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता. ३१) राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. धावडा ते वालसावंगी मार्गावरील भोयारेश्वर मंदिर फाटा येथून या दौडीला सकाळी सात वाजता सुरवात झाली. पाच किलोमीटर अंतराच्या या दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा संदेश देणाऱ्या या दौडीचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि देशभक्तीची भावना दृढ करणे हा होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात वाढोणा, विझोरा, वालसावंगी, धावडा, पारध आदी परिसरातील विद्यार्थी, महिला, पुरुष आणि नागरिकांनी सहभाग नोंदविला. राष्ट्रीय एकात्मतेसोबतच आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला.या दौडीला तरुणांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला व पुरुषांसाठी पाच आणि तीन किलोमीटर अशा दोन गटांत धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना वाढोणा येथील राणा मोबाईल शॉपीच्या वतीने प्रथम, पारध येथील इंडिया मोबाइल शॉपीच्या वतीने द्वितीय, तर रेणुकाई पिंपळगाव येथील राज मोबाईलच्या वतीने तृतीय पारितोषिक देण्यात आले. पारध पोलिस ठाण्याच्या वतीने विजेत्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
.....
आकाश बारवाल प्रथम
पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत आकाश बारवाल याने प्रथम, सुजित जाधव याने द्वितीय, तर अजय नरोटे याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या तीन किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत वैशाली सोनवणे हिने प्रथम, राणी जाधव हिने द्वितीय, तर परी तडवी हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेनंतर उपस्थित खेळाडू आणि नागरिकांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. युवकांना प्रोत्साहन देणारा आणि समाजाभिमुख पोलिसिंगचा प्रत्यय देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
......
ABD26J82438 फोटो ओळ : धावडा : राष्ट्रीय एकता दौडीच्या आयोजनप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी.