‘नॅचरल’च्या कामगारांची दिवाळी होणार गोड
दहा टक्के पगारवाढ अन् २५ टक्के बोनस जाहीर
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १० : कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आहे. कारखान्याच्या २५ व्या गाळप हंगामाच्या प्रारंभप्रसंगी समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ आणि आगामी दिवाळी सणासाठी २५ टक्के बोनस जाहीर केला आहे. शुक्रवारी (ता. ९) झालेल्या हंगामाच्या प्रारंभाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
संस्थापक अध्यक्ष ठोंबरे म्हणाले, की नॅचरल उद्योगाने नेहमीच शेतकरी आणि कर्मचारी या दोन्ही घटकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. साखर उद्योगात सर्वाधिक बोनस देण्याची आपली परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरी करता यावी, यासाठी यंदाही विक्रमी २५ टक्के बोनस देण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या शिफारशीनुसार कारखान्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना चालू वर्षातील १ ऑक्टोबर २०२६ पासून १० टक्के पगारवाढ लागू करण्यात येत असल्याची घोषणाही ठोंबरे यांनी यावेळी केली. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
.......
कामगार संघटनेकडून कृतज्ञता व सत्कार
संस्थापक अध्यक्षांनी घेतलेल्या या कर्मचारी-हितैषी निर्णयाचे कामगार वर्गात आणि परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. कारखान्याच्या २५ व्या गाळप हंगामाच्या निमित्ताने आणि कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ व २५ टक्के बोनस दिल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने ठोंबरे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
.......
फोटो ः बी. बी. ठोंबरे
क्रमांक ः OSM26B07159