नवरात्रोत्सवात मोबाइल बाजाराला तेजी
---
२० कोटींची उलाढाल, १५ ते ३५ हजारांच्या ५-जी स्मार्टफोनना पसंती
----
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : नवरात्रोत्सवाच्या काळात मोबाइल खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, शहरात दसऱ्याच्या दिवसापर्यंत २० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज मोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे यांनी व्यक्त केला. विशेषतः १५ ते ३० हजार रुपये किमतीच्या ५-जी स्मार्टफोनना ग्राहकांची पसंती मिळत आहे. मात्र, सुट्या भागांच्या किमती वाढल्याने मोबाइल महागले असले तरी विक्रीवर त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
सणासुदीच्या काळात नवीन मोबाइल घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. सॅमसंग, व्हिवो, ओप्पो, रिअलमी आणि रेडमी या कंपन्यांच्या मध्यम किमतीतील मोबाइलला अधिक मागणी आहे. प्रीमियम श्रेणीत ॲपल आणि वनप्लसच्या मोबाइलला ग्राहक पसंती देत आहेत. चांगला कॅमेरा, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि ५-जी सुविधा या बाबींना ग्राहक प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध योजना दिल्या जात आहेत. नो-कॉस्ट ईएमआय, शून्य डाउन पेमेंट, कॅशबॅक आणि जुना मोबाइल देऊन नवीन मोबाइल खरेदी करण्याच्या एक्स्चेंज ऑफरचा लाभ ग्राहक घेत आहेत. त्यामुळे बजेटनुसार मोबाइल निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
---
किमती वाढल्याने तुलना करून पसंती
सेमी कंडक्टर, मेमरी आणि इतर सुट्या भागांच्या किमती वाढल्याचा परिणाम मोबाइलच्या किमतींवर झाला आहे. काही मॉडेलच्या किमतीत दहा टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, सर्व कंपन्यांच्या आणि सर्व मॉडेलच्या किमती समान प्रमाणात वाढलेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहक खरेदीपूर्वी विविध कंपन्यांचे दर, वैशिष्ट्ये आणि उपलब्ध ऑफर यांची तुलना करत आहेत. आगामी सणासुदीच्या काळातही ही मागणी कायम राहण्याची अपेक्षा मोबाइल विक्रेत्यांना आहे.
---
कोणत्या किमतीच्या रेंजमध्ये सर्वाधिक विक्री?
१. १५ हजार ते २५ हजार रुपयांच्या किमतीच्या रेंजमधील सर्वाधिक विक्री ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत असून यात मध्यवर्गीयांचा समावेश आहे.
२. २५ हजार ते ४० हजार रुपयांच्या किमतीत सुमारे २५ टक्के मोबाइलची विक्री होत आहे. गेमिंग, हेवी मल्टिटास्किंग आणि फोटोग्राफीसाठी उत्सुक ग्राहक या अप्पर-मिड सेगमेंटमधील फोन्स खरेदी करत आहेत.
३. १० हजार ते १५ हजार रुपयांतील फोन्सची विक्री १५ टक्क्यांपर्यंत असून ज्येष्ठ नागरिक किंवा बेसिक स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी या रेंजमध्ये विक्री होत आहे.
५. ५० हजारांपुढील प्रीमियम वर्ग (सुमारे १० टक्के) : अॅपलच्या नवीन सीरिज तसेच सॅमसंगच्या अल्ट्रा आणि फोल्डेबल मॉडेल्सची सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी होत आहे.