परभणीत नवरात्रोत्सवाचा भक्तिमय उत्साहात शुभारंभ

परभणीत नवरात्रोत्सवाचा भक्तिमय उत्साहात शुभारंभ
Published on: 
फोटोसह PRB26B66024, PRB26B66025 परभणी : नवरात्रोत्सवासाठी शहरातील सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दुर्गा देवीच्या मूर्ती बाजारातून खरेदी केल्या. --------------- आदिशक्तीच्या आराधनेत परभणीकर तल्लीन ---------------------------- -नवरात्रोत्सवानिमित्त देवी मंदिरांत घटस्थापना -सायंकाळी दुर्गा मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ११ ः नवरात्रोत्सवानिस रविवारी (ता. ११) उत्साह, भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शहरातील देवीच्या विविध मंदिरांत सकाळपासूनच घटस्थापनेची लगबग सुरू होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. घरोघरी तसेच सार्वजनिक दुर्गा मंडळांच्या ठिकाणी धार्मिक विधी, पूजाअर्चा, घटस्थापनेच्या तयारीमुळे संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण होते. शहरातील गांधी पार्क परिसरातील श्री अष्टभूजा देवी मंदिर, कोमटी गल्लीतील पावडे यांचे श्री रेणुका माता मंदिर, शनिवार बाजारातील श्री दुर्गादेवी मंदिर, वसमत रस्त्यावरील श्री कालिका देवी मंदिरांसह देवी मंदिरांत सकाळपासूनच घटस्थापनेची तयारी सुरू होती. पहाटे ६.३० पासून घटस्थापनेचे मुहूर्त असल्याने अनेक भाविकांनी सकाळच्या सत्रातच विधिवत घटस्थापना केली. दुपारी १२.३० पर्यंत विविध ठिकाणी घटस्थापनेचे धार्मिक विधी सुरू होते. काही ठिकाणी सायंकाळी गोरज मुहूर्तावरही घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला देवीची पूजा, आरती, पारंपरिक धार्मिक विधींत भाविक तल्लीन झाले होते. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी मंदिरांची सजावट करण्यात आली असून, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत उत्साह दिसून येत होता. घरोघरीही नऊ दिवसांच्या उपासनेचा प्रारंभ झाल्याने धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले. शहरातील सार्वजनिक दुर्गा मंडळांनी सायंकाळच्या मुहूर्तावर देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. काही मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत देवीच्या मूर्तींच्या मिरवणुका काढल्या. या मिरवणुकांमुळे शहरातील प्रमुख रस्ते, परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. देवीच्या जयघोषाने परिसरात उत्साह संचारला. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठापना आणि पूजेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात आनंद, उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटस्थापनेपासूनच शहराने नवरात्रोत्सवाचे उत्साहात स्वागत केले असून, पुढील नऊ दिवस देवीच्या आराधनेने शहरातील वातावरण भक्तिमय राहणार आहे. ------------- घरोघरी दरवळला भक्तीचा सुगंध शहरात घरोघरी सकाळपासून लगबग सुरू होती. बाजारपेठेतही पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. घटस्थापनेनंतर शहरात आरतीचे मंगलध्वनी, धूप-दीपाचा सुगंध दरवळत होता. पहिल्या माळेपासूनच सर्वजण आदिशक्तीच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचल्याचे दिसून आले. -----------------
Marathi News Esakal
www.esakal.com