मेन
----
एनसीएमसी कार्डचा ‘डिजिटल’ झटका
----
- शंभरच्या रिचार्जवर १३ रुपयांचा भुर्दंड
- खासगी एजंटांचे कमिशन प्रवाशांच्या माथी
- कॅशलेस सक्तीचा उडाला पुरता फज्जा
- हिडन चार्जेस, सर्व्हर डाऊनचा वेगळा त्रास
--
बीड, ता. ७ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवेमध्ये डिजिटल व्यवहार आणि सुलभता आणण्यासाठी एक सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक व सवलतधारकांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या कॅशलेस धोरणाचा पहिल्याच आठवड्यात पुरता फज्जा उडाला असून, प्रवाशांची डिजिटल सुविधेच्या नावाखाली उघडपणे लूटमार सुरू आहे.
एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्डमध्ये १०० रुपये रिचार्ज केले, की थेट १३ रुपये गायब होत असून, खात्यात केवळ ८६ ते ८७ रुपयेच जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक प्रवाशांमधून याबाबत तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे सवलतीचे अर्धे तिकीट मिळविताना प्रवाशांना १३ रुपयांचा अघोषित भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे कार्ड प्रवाशांच्या सुविधेसाठी असेल, तर असा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना का सोसावा लागतोय? असा संतप्त सवाल बीड जिल्ह्यातील प्रवाशांमधून विचारला जात आहे. एसटी महामंडळाने कार्डचे वितरण आणि रिचार्ज हाताळण्याचे काम स्वतःकडे न ठेवता खासगी ऑपरेटर्स व एजंट्सच्या घशात घातले आहेत. जेव्हा एखादा सामान्य प्रवासी किंवा ज्येष्ठ नागरिक बाहेरील एजंटकडून आपले कार्ड रिचार्ज करतो, तेव्हा प्रति १०० रुपयांमागे १४ रुपये हे एजंट कमिशन आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग फी म्हणून परस्पर कापून घेतले जात आहेत.
खासगी कंपन्यांचे भले करण्यासाठी आणि एजंटांचे खिसे भरण्यासाठी एसटी महामंडळाने ही दरोडेखोरी प्रवाशांच्या माथी मारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. केवळ आर्थिक लूटच नाही, तर या प्रणालीचा तांत्रिक सावळा गोंधळही शिगेला पोचला आहे. ग्रामीण भागातील बस गाड्यांमध्ये आणि बसस्थानकांवर वाहकांच्या स्मार्ट मशीनचे सर्व्हर सतत डाऊन असतात. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात नाहक फेऱ्या माराव्या लागतात. सर्व्हर कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे रिचार्जसाठी प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. तसेच बऱ्याचदा प्रवाशांच्या कार्डमध्ये पैसे असूनही मशीन ते स्वीकारत नाही, ज्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये रोज जोरदार खडाजंगी उडत आहे. बसस्थानकांवर रिचार्ज केंद्रांचा प्रचंड अभाव असल्याने ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. शिवाय एका दिवसात काम न झाल्यास बसस्थानकात वारंवार खेट्या माराव्या लागतात. यात प्रवाशांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जातात.
----
सर्व्हर डाऊन अन् तांत्रिक सावळा गोंधळ
ग्रामीण भागातील एसटी बसस्थानकांवर आणि वाहकांच्या मशीनमध्ये सर्व्हर डाऊन असल्याने कार्ड स्कॅनच होत नाहीत. कार्ड असूनही पैसे वजा न झाल्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये रोज वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. अनेक ठिकाणी रिचार्ज केंद्रांचा अभाव असल्याने वृद्धांना ३० ते ४० किलोमीटर भटकंती करावी लागत आहे.
------
स्मार्ट कार्ड की लुटमारीची नवी व्यवस्था?
एक सप्टेंबरपासून घाईघाईने लागू केलेल्या कार्डमुळे प्रवाशांची सोय होण्याऐवजी त्यांचा मनस्तापच अधिक वाढला आहे. रिचार्ज करताना मिळणारी पावती, कपातीचे स्पष्टीकरण आणि सर्व्हरची गती या तिन्ही बाबींमध्ये गोंधळ आहे. त्यामुळे हे स्मार्ट कार्ड स्मार्ट नाही, तर स्मार्ट लुटीची व्यवस्था बनले आहे. पूर्ण तयारीनिशी यंत्रणा उभी न करता सक्ती लादणाऱ्या एसटी प्रशासनाने या १३ रुपयांच्या दरोड्याचे उत्तर द्यावे आणि तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत पूर्वीप्रमाणे आधार कार्डवर प्रवास सवलत लागू ठेवावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून होत आहे.
----
((कोट))
सरकारने आधार कार्डवर अर्ध्या तिकिटाची सोय केली होती, तीच बरी होती. हे नवीन कार्ड आल्यापासून डोक्याला ताप झालाय. १०० रुपये दिले, तर खात्यात फक्त ८७ रुपये दाखवितात. आमचे उरलेले १३ रुपये कुठे जातात? ही उघड-उघड गरिबांच्या खिशाला लावलेली कात्री आहे.
- शांताबाई मेखले, ज्येष्ठ महिला प्रवासी
----
((कोट))
डिजिटलच्या नावाखाली ही निव्वळ लूट सुरू आहे. ५० टक्के सवलत देतो, असे सांगून प्रत्येक रिचार्जमागे १३ रुपये परस्पर कापून घेतले जात आहेत. शिवाय बसमध्ये गेल्यावर वाहकाची मशीन सर्व्हर डाऊन दाखविते. कार्ड असूनही रोख पैसे देऊन पूर्ण तिकीट काढावे लागत असेल, तर या कार्डचा उपयोग काय?
- सविता कांबळे, महिला प्रवासी
---
((कोट))
सवलत मिळण्याऐवजी प्रवाशांना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. जोपर्यंत सर्व्हर आणि रिचार्जची यंत्रणा सुरळीत होत नाही, तोपर्यंत जुन्याच पद्धतीने आधार कार्ड किंवा ओळखपत्रावर सवलतीचा प्रवास सुरू ठेवावा.
- भागवत नागरे, ज्येष्ठ प्रवासी
---
((कोट))
एनसीएमसी कार्ड ही संपूर्ण राज्यभरात संगणकीय प्रणालीद्वारे राबविली जाणारी मध्यवर्ती योजना आहे. बाहेरील एजंटांकडून रिचार्ज करताना बँकिंग प्रक्रिया शुल्क आणि कमिशनमुळे काही रक्कम वजा होते. प्रवाशांनी आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी बसमधील वाहकाकडूनच (कंडक्टर) कार्ड रिचार्ज करून घ्यावे, तेथे फक्त दोन रुपये आकारले जातात. सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणींबाबत वरिष्ठ पातळीवर कळविले असून, लवकरच यंत्रणा सुरळीत होईल.
- नीलेश पवार, आगारप्रमुख, बीड