कळंब शाखेला अखेर
मिळाले शाखाधिकारी
पीककर्ज वाटपाला गती मिळण्याची अपेक्षा
कळंब, ता. ३१ (बातमीदार) : दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची गरज असताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कळंब शाखेतील शाखाधिकारी पद रिक्त असल्याने पीककर्जासाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. या प्रश्नाला ‘सकाळ’ने वाचा फोडल्यानंतर बँक व्यवस्थापनाने अखेर दखल घेतली. शनिवारी (ता. ३१) नवीन शाखाधिकारी तानाजी कोकाटे यांनी पदभार स्वीकारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पिकांचे नुकसान, घटलेले उत्पन्न आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामाची तयारी, बियाणे, खते आणि मशागतीसाठी पीककर्जाची गरज असताना नियमित शाखाधिकारी नसल्याने कर्जप्रकरणे रखडली होती. वारंवार बँकेत चकरा मारूनही काम होत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक पद्मसिंह पाटील यांनी सहायक व्यवस्थापक रूपेश झांबरकर यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवून पीककर्ज वाटपाचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी कर्जवाटप करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अखेर बँक व्यवस्थापनाने कायमस्वरूपी शाखाधिकाऱ्याची नियुक्त केली आहे. त्यामुळे रखडलेली कर्जप्रकरणे मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
......................
((कोट))
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बँकेच्या वतीने प्राधान्याने प्रयत्न केले जातील. पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज प्रकरणांचा तातडीने निपटारा करून त्यांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँकेशी संपर्क साधावा.
- तानाजी कोकाटे, शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, कळंब