ई-पीक पाहणी झालेल्या शेती प्लाॅटची मंजुरी ठप्प

ई-पीक पाहणी झालेल्या शेती प्लाॅटची मंजुरी ठप्प
Published on
ई-पीक पाहणी झालेल्या शेती प्लाॅटची मंजुरी ठप्प - जिल्ह्यातील तलाठ्यांचा कामावर बहिष्कार; सुमारे ३३० जण सहभागी - जुनीच ई-पीक पाहणी पद्धत लागू करण्याची तलाठी संघटनेची मागणी ......... सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३ ः राज्यात ॲग्रिस्टॅक अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ई-पीक पाहणी प्रणालीतील जाचक व अव्यवहार्य अटींमुळे तलाठी वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या नव्या नियमांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ३३० तलाठ्यांनी ई-पीक पाहणीच्या कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. यामुळे ऑनलाइन प्रणालीवरील ई-पीक पाहणीच्या मंजुरीचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसून त्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अव्यवहार्य प्रणाली नवीन नियमांनुसार पीक पाहणीचे काम सहायकांकडून करून घेतले जात आहे. मात्र, सहायकांनी अपलोड केलेले फोटो आणि माहिती ऑनलाइन सिस्टीमवर तीन-तीनवेळा मंजूर करावी लागते. शिवाय सहायक हे तलाठ्यांच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली नसतानाही, त्यांच्या विलंबाची किंवा चुकीच्या माहितीची जबाबदारी तलाठ्यांवर ढकलली जात आहे. यापूर्वी ई-पीक पाहणीमध्ये ९० टक्के काम शेतकरी स्वतः करत होते आणि केवळ १० टक्के नोंदी रँडमली मंजुरीसाठी येत होत्या. परंतु नव्या प्रणालीत १०० टक्के पडताळणी तलाठ्यांवर सोपवण्यात आल्याने प्रशासकीय गोंधळ उडाला आहे. तलाठी संघाचे निवेदन राज्य तलाठी संघाच्या शिष्टमंडळाने महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे. शासनाने या अन्यायी नियमांत सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ........... ((चौकट)) शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची भीती पीकविमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई आणि शासकीय योजनेच्या लाभासाठी ई-पीक पाहणीची नोंद अत्यंत आवश्यक असते. मात्र, महसूल प्रशासन आणि तलाठी यांच्यातील या वादामुळे ई-पीक पाहणीचे काम रखडले असून, वेळेत नोंदणी न झाल्यास पीकविमा व नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. .................... ((कोट)) पीक पाहणी सहायक तलाठ्यांच्या नियंत्रणात नाहीत, तरीही त्यांच्या कामाची जबाबदारी तलाठ्यांवर टाकणे अन्यायकारक आहे. पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी करण्याची संधी द्यावी. शेतकरी स्तरावरून राहिलेली पाहणीच सहायकांनी करावी. जोपर्यंत शासन स्तरावर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ई-पीक पाहणीचे काम सुरू करणार नाही. - विशाल खळदकर, जिल्हाध्यक्ष, तलाठी संघ, धाराशिव ........ ((पाईंटर)) या आहेत प्रमुख मागण्या - ‘माझी शेती, माझा सातबारा’ या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना स्वतः पीक पाहणी करण्याची सुविधा पूर्ववत सुरू करा. - शेतकऱ्यांनी नोंद न केलेल्या प्रकरणांचीच पाहणी सहायकांनी करा. - तलाठ्यांची भूमिका केवळ तांत्रिक पडताळणी व प्रमाणीकरणापुरतीच मर्यादित ठेवावी - १०० टक्के ऐवजी रँडम तपासणीची पद्धत पूर्ववत करा - डोंगराळ भाग, मोठे गट व जीपीएस त्रुटींमुळे २० मीटरच्या आत फोटो काढण्याची अट शिथिल करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com