NND26B03962 नांदेड : जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करताना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) जिल्हा विद्यार्थी मंचचे विद्यार्थी.
---
‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षा २०२४-२५ च्या
बॅचपासून लागू करा ः ‘निमा’ची मागणी
----
नांदेड, ता. २८ : बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित ‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षा २०२१-२२ ऐवजी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लागू करावी, अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) नांदेड जिल्हा विद्यार्थी मंचाने केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देण्यात आले.
२०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी परीक्षेबाबत स्पष्ट सूचना, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि तयारीसाठी पुरेशी संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर शैक्षणिक व मानसिक ताण वाढण्याची शक्यता निवेदनात व्यक्त केली आहे. निवेदनानुसार, ११ जून २०२५ रोजी आयुषमंत्र्यांनी २०२१-२२ आणि २०२२-२३ या बॅचसाठी परीक्षा लागू नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, ९ सप्टेंबर २०२५ रोजी २०२१-२२ च्या बॅचपासून परीक्षा लागू करण्याबाबत सूचना प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, २२ जुलै २०२५ रोजी राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने (एनसीएच) ही परीक्षा २०२४-२५ च्या बॅचपासून लागू करण्याची शिफारस केल्याचाही दावा निवेदनात केला आहे. या पार्श्वभूमीवर, २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या तिन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतून पूर्ण सूट देऊन २०२४-२५ च्या बॅचपासूनच ‘नेक्स्ट-आयुष’ परीक्षा लागू करावी, अशी मागणी विद्यार्थी मंचाने केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शासनाने याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.