बसच्या मंद हेडलाईटमुळे
रात्रीचा प्रवास धोकादायक
----------
जळकोट, ता. १४ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्यांचे हेडलाईट मंद प्रकाश देत असल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. रस्त्यावरील खड्डे, वळणे, समोरून येणारी वाहने आणि कडेचे अडथळे स्पष्ट दिसत नसल्याने चालकांना बस चालविताना मोठी अडचण येत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
मुखेड आगाराची सोलापूर- मुखेड बस (एमएच १४ बीटी २५२७) ५ नोव्हेंबर रोजी रात्री मुखेडकडे जात होती. यावेळी बसच्या हेडलाईटचा प्रकाश अत्यंत मंद असल्याचे निदर्शनास आले. ग्रामीण भागातील अंधाऱ्या रस्त्यांवर अशा सदोष प्रकाशयंत्रणेमुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुका शाखा जळकोटच्या वतीने नांदेड विभाग नियंत्रकांकडे निवेदन देण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे गरजेचे असून, सर्व एसटी बसगाड्यांच्या हेडलाईटची तातडीने तपासणी करावी, मंद प्रकाश असलेले हेडलाईट बदलावेत आणि प्रत्येक रात्रीच्या फेरीपूर्वी प्रकाशयंत्रणेची खात्री करूनच गाड्या सेवेत पाठवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.