शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nursery home for children of government employees

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर

औरंगाबाद : पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. त्यात घरात लहान मुलांना सांभाळणारे आजी-आजोबा शहरी भागात दिसत नाहीत. अशा परिस्थितीत चिमुकल्यांना पाळणाघरांत ठेवले जाते. अशाच प्रकारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठीही डे-केअर असावे म्हणून राज्यकर जीएसटी सहआयुक्त जी.श्रीकांत यांच्या पुढाकारातून राज्यातील पहिले शासकीय कार्यालयातील डे-केअर सेंटर येथील जीएसटी कार्यालयात सुरू झाले आहे.

शासकीय महिलांना प्रसूतीसाठी रजा मिळते. मात्र, त्यानंतर कामावर रुजू झाल्यावर नोकरी करून मुलांना सांभाळणे अडचणीचे जाते. राज्यकर जीएसटी कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांनाही चिमुकले सांभाळण्यासाठी अडचण येत असल्यामुळे सातत्याने सुटी घ्यावी लागत होती. ही अडचण जी. श्रीकांत यांच्या लक्षात आली. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याकडून शंभर रुपये कर्मचारी कल्याण निधीत जमा करीत हे डे-केअर सेंटर सुरू केले. या डे-केअरमध्ये सात महिन्याच्या चिमुकल्यापासून ते १२ वर्षांपर्यंत अशा एकूण १० ते १२ मुलांचा सांभाळ केला जात आहे.

अनेक कर्मचारी घरून येताना मुलांना सोबत आणून डे-केअरमध्ये सोडतात. घरी जाताना मुलांना सोबत घेऊन जात असल्यामुळे कर्मचारी आनंदाने काम करीत आहेत. विशेष म्हणजे, येथून स्वतंत्र इंटरनेट सुविधा देऊन सीसीटीव्हीची लिंकही पालकांच्या मोबाइलला कनेक्ट करण्यात आली आहे. यामुळे पालक कुठूनही आपल्या पाल्याच्या हालचालीवर लक्ष ठेवू शकतात.

औरंगाबादप्रमाणेच मुंबईच्या राज्यकर विभागाच्या कार्यालयात डे-केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी तेथील कर्मचारी संघटनेने केली जात आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अशाच प्रकारे डे-केअर सेंटर सुरू करावेत. यासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणीही आहे.

या आहेत सुविधा

डे-केअरमध्ये मुलांना पाळणा, झोका, खेळणी, शैक्षणिक साहित्य, अभ्यासासाठी टेबल खुर्ची, स्वतंत्र स्वच्छतागृह, गादी, चिमुकल्यांचा सांभाळ करण्यासाठी दोन महिला कर्मचारी आहेत.

आमच्या कार्यालयात ४० टक्के महिला कर्मचारी आहेत. यातील अनेक महिला या नेहमीच अनुपस्थित राहत होत्या. याची माहिती घेतल्यानंतर लहान मुलांना सांभाळण्यासाठी अडचणी असल्याचे समजले. मलाही एक छोटी मुलगी आहे. त्यामुळे मुलांना आपल्या आई किंवा वडिलांच्या डोळ्यासमोर असावे याच उद्देशाने आम्ही डे-केअर सेंटर सुरू केले. यामुळे महिला कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न सुटला.

-जी.श्रीकांत, सहआयुक्त वस्तू व सेवाकर