अंड्यांच्या पोषणमूल्याबाबत जनजागृती
परभणी, ता. १३ : जागतिक अंडी दिनानिमित्त पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी अंडी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंड्यांविषयीचे गैरसमज दूर करून त्यांचे पोषणमूल्य आणि दैनंदिन आहारातील महत्त्व पटवून देण्यावर यावेळी भर देण्यात आला.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वास साळुंके, डॉ. प्रकाश केकान आणि डॉ. धनंजय देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. काकासाहेब खोसे यांनी अंड्यांविषयी समाजात प्रचलित असलेले गैरसमज दूर करून त्यांच्या पोषणमुल्याची माहिती दिली. नोडल अधिकारी डॉ. म्हाळसाकांत निकम यांनी दैनंदिन आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे महत्त्व विशद केले. अंड्यांमधील पोषक घटक शरीराची वाढ आणि उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. साळुंके यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दहा जणांपर्यंत अंड्यांच्या पोषणमूल्याची माहिती पोचवावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शेवटी उपस्थितांना उकडलेल्या अंड्यांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. हनुमंत मानेमोड यांनी, तर आभार डॉ. तेजस पिसाळ यांनी मानले.