बीड पान १ साठी

बीड पान १ साठी
Published on: 
पान १ लीड ----- बीडकरांची लाहीलाही; तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार ऑक्टोबर हिटचा तडाखा; अडगळीत गेलेले कुलर पुन्हा झाले सुरू; डॉक्टरांचा सल्ला सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २० ः एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे आणि हुलकावणीमुळे जिल्ह्यात आधीच पाण्याचे मोठे आणि संकट उभे ठाकले असताना, आता बीडकरांना कडक ऑक्टोबर हिटचे अत्यंत तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत साधारणपणे थंडीची चाहूल लागणे अपेक्षित असते; मात्र, सध्या वातावरणात अचानक उष्णतेची मोठी लाट जाणवू लागली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा चक्क ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, वाढत्या उकाड्याने नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. उन्हाचा तडाखा इतका भयंकर आहे की, घराबाहेर पडताना नागरिकांना रुमाल, टोपी आणि उपरण्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सकाळचे नऊ वाजल्यापासूनच सूर्याचा तडाखा वाढू लागतो. जसजसा दिवस पुढे सरकतो, तसतशी उन्हाची तीव्रता अधिकच भयंकर रूप धारण करते. दुपारच्या वेळेस तर आकाशातून अक्षरशः आग ओकली जात असल्याचा भास होतो. रस्त्यांवरून चालताना गरम झळा अंगावर येत असल्याने, दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर अघोषित शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक अत्यंत महत्त्वाची कामे असल्याशिवाय बाहेर पडणे टाळत आहेत. जे नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत, ते तीव्र उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी डोक्याला रुमाल, गमजा, स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर आवर्जून करताना दिसत आहेत. वातावरणातील या अचानक झालेल्या बदलामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. सततच्या उकाड्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास वाढला आहे. उष्माघात सदृश लक्षणे, अचानक ताप येणे, डोकेदुखी आणि कमालीचा थकवा जाणवण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे सध्या शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार, सध्या दिवसाचे कमाल तापमान ३५ अंशांच्या वर, तर रात्रीचे किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे. हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा अधिक तीव्र जाणवत असून, पुढील काही दिवस तापमानातील हा चढउतार असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ------ अडगळीतील कुलर पुन्हा बाहेर पावसाळा सुरू होताच नागरिकांनी आपले कुलर आणि एसी अडगळीत किंवा झाकून ठेवले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यातील या कडक उन्हामुळे आणि असह्य उकाड्यामुळे हे अडगळीत ठेवलेले कुलर आणि पंखे आता पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहेत. उन्हाच्या या तडाख्यापासून थोडासा आराम मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयांकडे वळले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यावरील लिंबू सरबत, उसाचा रस, ताक आणि वाळा टाकलेले माठातले पाणी, तसेच नारळपाणी यांसारख्या शीतपेयांच्या गाड्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ----- अशी घ्या स्वतःची काळजी वाढत्या उकाड्यात आरोग्याला जपणे अत्यंत गरजेचे आहे. घराबाहेर पडताना नेहमी सुती आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. सोबत पाण्याची बाटली कायम ठेवावी. तहान लागण्याची वाट न पाहता दर थोड्या वेळाने पाणी पीत राहावे. उन्हातून आल्यावर लगेचच फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळावे. कलिंगड, संत्री, मोसंबी अशा रसदार फळांचा आहारात समावेश करावा. दुपारच्या वेळेत, विशेषतः १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. ----- कोट ऑक्टोबर हिटमुळे तापमानात अचानक वाढ झाली असून, वातावरणात उकाडा प्रचंड वाढला आहे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोकेदुखी आणि अशक्तपणा अशा त्रासांचे रुग्ण ओपीडीमध्ये वाढत आहेत. नागरिकांनी विनाकारण कडक उन्हात जाणे टाळावे. भरपूर पाणी, लिंबू सरबत, ताक यांसारख्या नैसर्गिक पेयांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. बाहेर पडताना सुती कपडे वापरावेत आणि डोक्याला रुमाल किंवा टोपी नक्की बांधावी. - डॉ. नितीन रायमुले, एम. डी. मेडिसिन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com