ऑक्टोबर हीटने भाजीपाला सुकला
--
गाजर, कारले, कोबी, भेंडी, मिरचीसह बहुतांश भाज्यांची आवक घटली
--
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : ऑक्टोबर हीटचा परिणाम आता भाजीपाल्याच्या बाजारावरही जाणवू लागला आहे. दिवसभर कडक ऊन आणि रात्रीचा उकाडा यामुळे भाजीपाला सुकत असल्याने आवक आणि टिकाऊपणावर परिणाम झाला. परिणामी, गेल्या काही दिवसांत गाजर, कारले, कोबी, भेंडी, वांगी, हिरवी मिरची आणि सिमला मिरचीची आवक घटल्याने भावात किलोमागे २० ते ४० रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, चिकलठाणा येथील किरकोळ भाजीपाला बाजारात सध्या बटाट्याचे भाव २५ ते ३० रुपये, कांदा ६० ते ७० रुपये, भोपळा ४० रुपये, काकडी ४० रुपये, तर टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो आहे. वांग्याचे भाव ४० वरून ६० रुपये, भेंडी ४० वरून ६० रुपये, तर गाजर, कारले, कोबीचे भाव ६० वरून ८० रुपये किलो झाले आहेत. हिरवी मिरची आणि सिमला मिरचीही ८० रुपये किलोवर पोचली आहे. दिलपसंद १०० रुपये, वाल व गिलके ८० रुपये, शेवगा १०० रुपये, दोडके ८० रुपये, तर श्रावण घेवडा ६० रुपये किलोने मिळत आहे. लिंबाचा भाव तब्बल २४० रुपये किलो असून, आल्याचे (अद्रक) हायब्रिड आणि गावरान प्रकार अनुक्रमे १६० व २४० रुपये किलो आहेत. हायब्रिड लसूण २५०, तर गावरान लसूण ३०० ते ४०० रुपये किलोपर्यंत वधारला आहे. कारली/कर्टुले २०० रुपये किलो आहेत. पालेभाज्यांमध्ये मेथी २० रुपये जुडी, तर पालक, शेपू आणि चुका १५ रुपये जुडीने मिळत आहेत.
---
रताळी, ओली हळद बाजारात दाखल
या हंगामातील नवीन रताळी बाजारात दाखल झाली असून, सध्या त्यांना १०० रुपये किलोचा भाव मिळत आहे. नवरात्रातील उपवासासाठी रताळ्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओली हळदही बाजारात आली असून, तिचा भाव १५० रुपये किलो आहे. ओली हळद लोणचे आणि भाजीसाठी वापरली जाते. विशेषतः राजस्थानी लोकांमध्ये ओल्या हळदीची भाजी लोकप्रिय असून, थंडीच्या दिवसांत तिचे सेवन आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. आवळा आणि ओल्या हळदीचा काढाही आरोग्यासाठी घेतला जातो, असे औरंगपुरा येथील विक्रेते संजय वाघमारे यांनी सांगितले.
---
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
बटाटे : २५ ते ३० रुपये
कांदा : ६० ते ७० रुपये
भोपळा : ४० रुपये
काकडी : ४० रुपये
टोमॅटो : ३० ते ४० रुपये
वांगी : ६० रुपये
भेंडी : ६० रुपये
गाजर : ८० रुपये
कारले : ८० रुपये
कोबी : ८० रुपये
वाल : ८० रुपये
गिलके : ८० रुपये
हिरवी मिरची : ८० रुपये
सिमला मिरची : ८० रुपये
दिलपसंद : १०० रुपये
लिंबू : २४० रुपये
दोडके : ८० रुपये
शेवगा : १०० रुपये
हायब्रिड आलं (अद्रक) : १६० रुपये
गावरान आलं (अद्रक) : २४० रुपये
हायब्रिड लसूण : २५० रुपये
गावरान लसूण : ३०० ते ४०० रुपये
श्रावण घेवडा (बीन्स) : ६० रुपये
कर्टुले/कंटुले : २०० रुपये